नाशिक : ‘आरोग्य’च्या 19 मे पासून परीक्षा | पुढारी

नाशिक : ‘आरोग्य’च्या 19 मे पासून परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र-2022 परीक्षा 19 मेपासून सुरू होत आहेत. परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमांचे पेपर होणार आहेत. दुसर्‍या टप्प्यातील परीक्षा 1 जुलैपासून घेण्यात येणार आहेत.

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र-2022 परीक्षा राज्यातील विविध परीक्षा केंद्रांमध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी एकूण 2,200 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार दुसर्‍या टप्प्यात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम वगळता, उर्वरित सर्व पदव्युत्तर विद्याशाखेच्या वैद्यकीय, दंत, आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवण दोष, कृत्रिम अवयव विज्ञान, परिचर्या व सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या पदवीच्या सर्व वर्षांच्या लेखी परीक्षा 1 जुलैपासून सुरू होतील. या परीक्षा 31 ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहेत. या परीक्षेला एकूण 45,000 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली. परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हिवाळी सत्राचा मे अखेरीस निकाल 
आरोग्य विद्यापीठाच्या हिवाळी सत्र- 2021 परीक्षेचे निकाल 14 दिवसांच्या आत विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखांचे पदवीच्या एकूण 74,661 विद्यार्थ्यांचे सर्व वर्षांच्या हिवाळी सत्र-2021 परीक्षांच्या प्रात्यक्षिक परीक्षा व लेखी परीक्षांचे उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन सुरू आहे. या परीक्षांचे निकाल मे अखेरीस जाहीर करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button