नाशिक : दीडशे कोटींच्या रस्त्यांचा मार्ग मनपा आयुक्तांच्या पाहणीतून मोकळा | पुढारी

नाशिक : दीडशे कोटींच्या रस्त्यांचा मार्ग मनपा आयुक्तांच्या पाहणीतून मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेतर्फे शहरात जवळपास 600 कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे गेल्या दोन वर्षांमध्ये प्रस्तावित करण्यात आली आहेत. सध्या सुरू असलेली कामे व नव्याने होणार्‍या कामांची पाहणी करीत दर्जेदार कामे केली जात आहेत की नाही, याची तपासणी मनपा आयुक्त रमेश पवार यांच्याकडून सुरू आहे. विशेष म्हणजे, सुटीच्या दिवसांतही आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना विविध प्रभागांमध्ये पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्तांनी पाहणी दौरे सुरूच ठेवल्यामुळे रखडलेल्या 150 कोटींच्या रस्त्यांच्या कामांचा मार्ग मोकळा होणार आहे.

शहरात अनेक ठिकाणी नव्याने सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा संशयास्पद आहे. डांबराचा पहिला थर 50 एमएमऐवजी 15 ते 30 एमएमच टाकला जात असल्याने अधिकारी आणि ठेकेदारांची मिलीजुली उघड झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने पंचवार्षिक मुदत संपण्याआधीच सर्वपक्षीय नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये सुमारे 434 कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे मंजूर केली होती. 434 कोटींपैकी जवळपास 270 कोटी रुपयांच्या कामांचे कार्यारंभ आदेश दिले असताना, पुढील आर्थिक वर्षातील तरतूद लक्षात घेऊन प्रस्तावित केलेली 150 कोटींची कामे रखडली होती. त्यात बरीचशी कामे शिवसेनेच्या नगरसेवकांची असल्यामुळे अस्वस्थता व्यक्त होत होती.

पाहणी दौर्‍याअंतर्गत नाशिक पूर्व विभागातील मुंबई नाका ते हॉटेल छानजवळील शिवाजीवाडी घरकुल योजनेचा 30 मीटर डीपी रस्ता, इंदिरानगर बोगदा ते साईनाथनगर चौफुली, वडाळा चौफुली ते एचपी गॅस गोदाम रविशंकर मार्गापर्यंत, सावता माळी मार्ग, एचपी गॅस गोदाम जंक्शनपासून रविशंकर मार्गाने के. के. वाघ इंग्लिश स्कूलजवळील प्रस्तावित क्रीडा संकुल येथील रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यात आली. पश्चिम विभागातील बाळासाहेब ठाकरे इतिहास संग्रहालय येथे उद्यान रिक्रिएशन सेंटर विकसित करणे, विसे चौक ते कुसुमाग्रज स्मारक रस्ता अस्तरीकरण करणे, कुसुमाग्रज स्मारक ते गंगापूर नाका-गांगुर्डे हॉस्पिटल रस्ता खडीकरण करणे, चोपडा लॉन्स ते डॉ. केकाण हॉस्पिटल (जोशीवाडा) रस्ता अस्तरीकरण करणे, घारपुरे घाट गोदावरीनगर येथे बोट क्लब बांधणे, पंचवटी विभागातील नाट्यगृह इमारत व त्यालगतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे, गुंजाळबाबानगर पुलाचे रुंदीकरण आदी कामांची पाहणी करण्यात आली.

माजी नगरसेवकांच्या मनपा आयुक्तांकडे खेटा..
कार्यारंभ आदेश देण्यासाठी माजी नगरसेवक आयुक्तांकडे खेटा मारत आहेत. त्या अनुषंगाने आयुक्तांनी संबंधित कार्यारंभ आदेश देण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष पाहणी दौरे सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (दि. 14) सुटीच्या दिवशी आयुक्तांनी पूर्व, पश्चिम व पंचवटी विभागांत सुरू असलेल्या व कार्यादेश देणे बाकी असलेल्या कामांची पाहणी केली.

हेही वाचा :

Back to top button