छगन भुजबळ : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न’ | पुढारी

छगन भुजबळ : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न'

येवला (जि. नाशिक), पुढारी वृत्तसेवा : जगभरातील देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेचा अभ्यास करतात. आणि त्‍यानुसार त्यांच्या देशाची घटना तयार करतात. जगभरात केवळ धर्माच्या नावाने निर्माण झालेल्या राष्ट्रात कायमच उलथापालथ होत आहे. मात्र भारतासारख्या देशाला एकत्रित ठेवण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने केलेले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न आहेत. केवळ आपल्या देशावरच नाही तर जगावर त्‍यांचे उपकार आहेत असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला येथील मुक्तिभूमी स्मारक परिसरात विविध विकासकामांचे आज भूमिपूजन पार पडले. यामध्ये प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय-वाचनालय, कर्मचारी निवासस्थान, अतिथी निवासस्थान व इतर सुविधा पुरविणे या एकूण १५ कोटी रुपयांच्या विकासकामे करण्यात आली आहेत.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रमुख तीन टप्पे आहेत. यामध्ये मुक्ती भूमी, दीक्षा भूमी आणि चैत्य भूमी या तीनही भूमीना विशेष असे महत्व आहे. अनेक प्रयत्नानंतर अन्याय अत्याचार थांबत नसल्याने हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली.

येवल्यातील मुक्ती भूमीवर त्यांनी धर्मांतराची ही घोषणा केली. रक्ताचा एक थेंब न सांडता देशातील ७ कोटी लोकांमध्ये धर्मपरिवर्तन घडवून आणले. जगातील ही एकमेव अशी घटना आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श लाभल्यामुळे हे स्थान तीर्थस्थळ बनलेले आहे. या भूमीवरील माती आपल्या कपाळावर लावून या भूमीचा सन्मान राखावा, असे भुजबळ म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, भारतीय राज्यघटना ही सर्वोत्तम आहे. मात्र ज्यांच्या हातात सत्ता जाईल ते या घटनेचा वापर कसा करतील त्यावर तिचे श्रेष्ठत्व ठरणार आहे. एकाला एक आणि एकाला एक न्याय दिला तर लोकशाही टिकणार नाही. या राज्यघटनेला हात लावणे तर दूर याकडे वाकडया नजरेने बघण्याची कुणाची हिम्मत होता कामा नये. तर धर्माधर्मात वाद लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आणि द्वेष पसरविला जात आहे. लोकशाही व्यवस्थेला हे घातक आहे. तसेच अंधश्रद्धेचा पगडा घालण्याचा लोक काही प्रयत्‍न करत आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली सर्वसामान्यांचा बळी जात आहे. अन्यायाच्या विरुद्ध हा लढा लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला प्रेरणा देतात, त्यामुळे हेच आपले आदर्श आहेत, असे त्‍यांनी यावेळी सांगितले.

दरम्‍यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या गावांचा विकास करणे. तसेच सामाजिक न्यायमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार या ऐतिहासिक स्थळाच्या विकास कामांना मंजुरी प्रदान केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री मंडळाचा शपथविधी झाल्यानंतर सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी पार पडत आहे. सर्वात प्रथम मुक्ती भूमीच्या विकासाचे हे काम मंजूर करण्यात आले आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळे हे काम थांबले होते. मात्र आता पुन्हा निधी मंजूर करून घेतला आहे. तसेच मुक्तीभूमी स्मारकाच्या परिसराला जोडणाऱ्या रस्त्यांचा सुध्दा विकास करण्यात आला आहे.

दरम्‍यान, भूमिपूजन समारंभ सुरू असतानाच पालकमंत्री छगन भुजबळ यांना भ्रमणध्वनीवरून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मुक्तीभूमीच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.

हेही वाचा  

Back to top button