पुणे : मारुंजी येथे भरधाव डंपरने दुचाकीवरील दोघांना चिरडले | पुढारी

पुणे : मारुंजी येथे भरधाव डंपरने दुचाकीवरील दोघांना चिरडले

हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा : हिंजवडी आयटी पार्क शेजारील मारुंजी (शिंदे वस्ती) येथील चौकात भरधाव आलेल्या मालवाहू डंपरने दुचाकीवरील दोघांना चिरडले. या अपघातात अमराराम चौधरी (वय ४३), अशोक राम (वय २६) हे दोघे जागीच ठार झाले. ही घटना गुरुवारी (दि. १४) दुपारी साडे चारच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, हिंजवडी लक्ष्मी चौकाकडून डंपर (एमएच १४ सिपी १६३८) मारुंजीच्या दिशेने भरधाव जात होता. दरम्यान येथील शिंदे वस्ती चौकात फेज दोनच्या दिशेने आलेले दुचाकीस्वार लक्ष्मी चौकाकडे वळत असताना डंपरने यांना जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीस्वार डंपरच्या मागील चाकाखाली येऊन जागीच ठार झाले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेनंतर डंपर चालक फरार झाला आहे. दरम्यान शिंदेवस्ती येथील हा चौक सततच्या अपघातामुळे धोकादायक ठरला आहे. येथे अनेक अपघात होतात. मात्र, आज येथे दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने येथे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button