पानसरे हत्या प्रकरण : डॉ. वीरेंद्र तावडेसह सर्व संशयितांचा कटात समान सहभाग | पुढारी

पानसरे हत्या प्रकरण : डॉ. वीरेंद्र तावडेसह सर्व संशयितांचा कटात समान सहभाग

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

गोविंदराव पानसरे खून खटल्यातील संशयित डॉ. वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे हे थेट गोळीबाराच्या ठिकाणी नसले, तरी ते कटात सहभागी होते. पानसरे यांच्यावर गोळीबार करणारे सारंग अकोळकर व विनय पवार या दोघांइतकीच इतर संशयितांची भूमिका असल्याने त्यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळावा, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर व अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी केला.

पानसरे हत्येचा तपास करणार्‍या एसआयटी पथकाने डॉ. तावडे, समीर गायकवाड, सचिन अंदुरे यांना अटक केली आहे. या सर्वांना दोषमुक्त करावे, असा अर्ज संशयितांच्या वकिलांनी सादर केल्यानंतर दोन्ही बाजूंनी जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्यासमोर युक्तिवाद करण्यात आला.

बुधवारी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी अंदुरे व डॉ. तावडे हे प्रत्यक्ष गोळ्या झाडताना घटनास्थळी नसले, तरी त्यांचा कटात सहभाग आहे. डॉ. तावडे हा याच परिसरात थांबून होता. संपूर्ण कट रचणे, शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण, बैठका या डॉ. तावडेने घेतल्याचे पुरावे पोलिसांकडे उपलब्ध आहेत. तसेच या कटातील प्रत्येक संशयिताचा सहभाग समानच असल्याने त्यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद त्यांनी केला. या अर्जावर 22 एप्रिल रोजी निकाल होण्याची शक्यता आहे. पानसरे कुटुंबीयांच्या वतीने अ‍ॅड. चेतन शिंदे यांनी वकीलपत्र घेत असल्याचा अर्ज मंजूर करण्यात आला.

Back to top button