नाशिक : घोटी खुर्दला पाच एकर ऊस जळून खाक; महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे लाखोंचे नुकसान | पुढारी

नाशिक : घोटी खुर्दला पाच एकर ऊस जळून खाक; महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे लाखोंचे नुकसान

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील घोटी खुर्द शिवारात शॉर्टसर्किटमुळे तब्बल 5 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (दि.12) दुपारच्या सुमारास घडली. महावितरणच्या भोंगळ कारभाराने शेतकर्‍याचे लाखोंचे झाले असून तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यासह घोटी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

शेतकरी रामनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी घोटी खुर्द शिवारातील दारणा धरणालगतच्या आपल्या शेत गट नंबर 165, 166, 168, 172 (1) (2) मध्ये 7 एकर उसाची लागवड केली होती. वर्षभर काबाडकष्ट करीत उसाला जगवण्यासाठी त्यांनी रात्र-रात्र पिकाला पाणी दिले होते. अशात काही दिवसांपासून ऊसही तोडणीला आला होता. मात्र, संगमनेर व अकोले येथील साखर कारखान्याचे ऊसतोड कामगारांकडून ऊसतोड केली जात नव्हती. अशात रामनाथ शिंदे यांनी कारखान्याला निवेदन देत लवकरात-लवकर ऊसतोड करण्याची मागणी केली होती. पुढील 2-3 दिवसांत ऊसतोड होणार असल्याने तेही समाधानी होते. मात्र, अशात मंगळवारी (दि.12) दुपारच्या सुमारास शेतातून गेलेल्या वीजवाहक तारांमध्ये हवेने घर्षण होऊन ठिणग्या पडल्याने उसाला भीषण आग लागली. अशात वार्‍याचा वेग अधिक असल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. परिसरातील शेतकर्‍यांनी आगीचे लोळ बघताच शिंदे यांना याबाबत माहिती दिली. शिंदे यांनी तत्काळ शेताकडे धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने व्यापक रूप धारण केल्याने शेतकर्‍याच्या डोळ्यासमोर त्यांचा तब्बल 5 एकर ऊस जळून खाक झाला.

नुकसानभरपाई देण्याची शेतकर्‍यांची मागणी
शेतातून गेलेल्या वीजतारांमध्ये मोठ्या प्रमाणावर झोळ पडल्याने थोड्याशा हवेमुळे या तारा एकमेकांच्या संपर्कात येत असतात. याबाबत महावितरणला अनेकवेळा याबाबत माहिती देऊनही त्यांच्याकडून कुठलीही दखल न घेतल्याने या घटनेत शिंदे यांचे लाखोंंचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका बसल्याची तीव्र भावना शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा:

Back to top button