

पुणे : पुढारी वृत्तसेवा
मोक्काच्या गुन्ह्यातून नुकताच कारागृहातून बाहेर आलेल्या एका सराईत गुन्हेगाराचा सहा ते सात जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके व दगडाने ठेचून निर्घृण खून केला. सनी हिवाळे असे खून झाल्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार साहील इनामदार हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वानवडी येथील मसोबा चौक काळेपडळ परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. नऊ तारखेला तो कारागृहातून बाहेर आला आहे. मंगळवारी तो त्याच्या मित्रासोबत चौकात उभा होता. त्या वेळी दुसरीकडे एक वाढदिवस साजरा करण्यात येत होता. हिवाळे तेथे गेला होता. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीतून सहा ते सात जणांनी त्याला लाकडी दांडके व दगडाने बेदम मारहाण केली. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.