अंदरसूल ( जि.नाशिक ), पुढारी वृत्तसेवा : येवला तालुक्यातील बोकटे गावातील माध्यमिक विद्यालयात पालक, पदाधिकारी व ग्रामस्थांनी आज (दि.१२) भेट देऊन पोषण आहाराची पाहणी केली. यावेळी शिल्लक पोषण आहार धान्यास कीड लागली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बोकटे गावातील स्वामी मुक्तानंद विद्यालयात पोषण आहारा संदर्भात पालक, व ग्रामस्थांनी चौकशी केली. यावेळी पोषण आहारातील शिल्लक धान्यसाठ्यात किड आढळून आली आहे. बोकटे येथील सरपंच,पोलीस पाटील, स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांनी मुख्याध्यापक यांना याबाबत विचारणा केली. त्यांनी सुधारीत धान्यसाठा येणे कामी संबंधित विभागास पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. मात्र शिल्लक असलेल्या धान्यसाठ्यात १८० किलो तांदूळ वगळता, किड लागलेले १८० किलो मूगडाळ, ८१ किलो तूरडाळ,१३१ किलो मटकी १७९ किलो हरभरा,५४ किलो मुगात मोठ्या प्रमाणात भुंगे आढळून आले आहेत. येथील मूला – मुलींचे आरोग्य धोक्यात आणू नये. सुधारित धान्यसाठा त्वरित न आल्यास संबंधित दोषींवर कारवाई न झाल्यास, मा.गटविकास अधिकारी येवला यांना ग्रामस्थ व पालकांनी उपोषणाचा ईशारा दिला आहे.
या वेळी बोकटे येथील सरपंच प्रताप दाभाडे, पोलीस पाटील सुरेश दाभाडे,भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती चे येवला तालुका अध्यक्ष हितेश दाभाडे,पालक दिपक दाभाडे,गणेश जगताप, दिपक साळवे, ग्रामपंचायत सदस्य विलास दाभाडे, कमलेश दाभाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा