सोलापूर : शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचाच पत्ता नसताना ३२ महिला रुग्णांना दिली भूल ! | पुढारी

सोलापूर : शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचाच पत्ता नसताना ३२ महिला रुग्णांना दिली भूल !

वैराग, पुढारी वृत्तसेवा : वैरागसह तालुक्यातील ४ आरोग्य केंद्राअंतर्गत विविध गावातील ३२ महिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेसाठी ठरलेल्या वेळेप्रमाणे रुग्णांना भूल देण्यात आली. मात्र, भूल दिल्यानंतर तब्बल ४ तास शस्त्रक्रिया करणारे सर्जन उपलब्ध न झाल्याने रुग्णाचा जीव धोक्यात आला होता. परंतु, डॉक्टर आल्यानंतर शस्त्रक्रियांना सुरुवात झाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारावर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील ९ , तडवळे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गावातील ५, गौडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील १६ तर पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील २ महिला रुग्णांना वैराग येथील आरोग्य केंद्रात दाखल केले होते.

आज सकाळी ७ वाजल्यापासून उपाशी पोटी सदर महिला रुग्ण नातेवाईकांसह वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या होत्या. ३२ रूग्णांवर दुपारी दोन वाजता शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती असल्यामुळे त्यांना साडेबारा वाजण्याच्या सुमारास भूल देण्यात आली.

मात्र, भूलतज्ञ हे वडाळा येथील शस्त्रक्रिया कॅम्प संपून वैरागकडे येत असताना अचानक ते उस्मानाबाद येथे गेले. त्यामुळे या महिला शस्त्रक्रियेसाठी ताटकळत बसल्याच्या दिसून आल्या. त्यांना भूल दिल्याने सर्वांची पाचावरण धारण बसली होती. वास्तविक पाहता शस्त्रक्रिया करण्यापूर्वी फक्त दहा ते पंधरा मिनिट अगोदर रुग्णांना भूल देण्यात येते. मात्र, त्यांना ४ तासाहून अधिक काळ भूल दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button