नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्याच्या कोळपेवाडी भागात लांडगासदृश प्राण्याच्या हल्ल्यात सात नागरिक जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.११) घडली. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. पहाटे ६ ते सकाळी ११ दरम्यान या प्राण्याने दोन्ही गावांतील नागरिकांवर हल्ला केला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणारा प्राणी लांडग्यासारखा आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांच्या वेशीवरील कारवाडी, शहाजापूर, रामपूर, भरतपूर या परिसरात या प्राण्याचा वावर असल्याचा अंदाज आहे. रामपूरला विठाबाई नरोडे या महिलेवर हल्ला झाला. त्यानंतर एका वस्तीवर हल्ला झाला. तशाच प्रकारचे हल्ले भरतपूर आणि कोळपेवाडी शिवारातील वेगवेगळ्या ठिकाणी झाले. दोन्ही गावांतील सात नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.
जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार अलका चांगदेव म्हस्के (४५), ताराबाई काशीनाथ थोरात (३५), विठाबाई अर्जुन नरोडे (६०), महेश विलास खालकर (२६), रावसाहेब सोमनाथ खरात (३५), वैष्णवी शरद आवारे (१९), गुलाब सलीम शेख (६५) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याचे दिसते. वनविभागाने या प्राण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.