नाशिक : शहरात आज श्रीराम-गरुड रथ मिरवणूक ; पाहा ‘कसा’ आहे मार्ग | पुढारी

नाशिक : शहरात आज श्रीराम-गरुड रथ मिरवणूक ; पाहा 'कसा' आहे मार्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील पंचवटी येथून मंगळवारी (दि.12) दुपारपासून श्रीराम रथ व गरुड रथ मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत भाविकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे शहर वाहतूक शाखेने खबरदारी म्हणून मिरवणूक मार्गावरील वाहतूक ही मिरवणूक संपेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला असून, वाहनचालकांना पर्यायी मार्गाने जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात मंगळवारी दुपारनंतर श्रीराम रथ व गरुड रथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजापासून गौरी पटांगण, गाडगे महाराज पटांगण, साईबाबा मंदिर, अहिल्याराम व्यायामशाळा, रामकुंड, कपालेश्वर मंदिर, अंबिका चौक, मालवीय चौक, शनि चौक, काळाराम मंदिर उत्तर दरवाजापासून नाग चौक, काट्या मारुती पोलिस चौकी, देवी मंदिर, गणेशवाडी, गौरी पटांगण, रोकडोबा मारुती मंदिर, गाडगे महाराज पुलाखालून नेहरू चौक, अंबिका चौक, मालवीय चौक, शनि चौक व काळाराम मंदिर चौक असा मिरवणूक मार्ग राहणार आहे. मिरवणुकीत भाविकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गांत बदल करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी वाहतूक मार्गात बदल केले असून, काट्या मारुती चौकाकडून गणेशवाडीकडे मेनरोडमार्गे जाणारी वाहतूक काट्या मारुती चौक-पंचवटी कारंजा-मालेगाव स्टँड-आरकेकडून इतरत्र वळविली आहे. त्याचप्रमाणे काट्या मारुती-संतोष टी पॉइंट, द्वारका सर्कल-सारडा सर्कल मार्गेही वाहतूक वळविण्यात आली आहे.

‘मिरवणूक मार्गावरून वाहने नेऊ नये’
बादशाही कॉर्नर-शालिमार-गंजमाळ-सीबीएस-अशोकस्तंभ-रविवार कारंजामार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पंचवटी, सरकारवाडा पोलिसांसह शहर वाहतूक शाखेचे पोलिस नियोजन करीत आहेत. मंगळवारी दुपारी 3 वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक मार्गांत बदल राहणार आहेत. त्यामुळे मिरवणूक मार्गांवरून वाहने नेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button