कोल्हापूर उत्तर विधानसभा : नेत्यांची भाऊगर्दी, आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेली निवडणूक | पुढारी

कोल्हापूर उत्तर विधानसभा : नेत्यांची भाऊगर्दी, आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेली निवडणूक

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान मंगळवारी होत आहे. महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात ही थेट निवडणूक होत असून, निकालासाठी शेकडोजणांनी पैजा लावल्या असल्या तरी निकाल काय लागणार, याचा अंदाज बांधता येत नाही. चारही पक्षांच्या दिग्गज नेत्यांची भाऊगर्दी आणि प्रचारसभांत झालेले आरोप-प्रत्यारोप यांनी ही पोटनिवडणूक कमालीची गाजली.

दोन्ही बाजूंनी प्रचंड तयारी करण्यात आली होती आणि दोन्ही बाजूंच्या सभांना गर्दीही झाली होती. तथापि, मतदार नेमका काय कौल देतील, हे सांगणे कठीण झाले आहे. निकालाविषयी अशी विलक्षण अनिश्‍चितता असतानाच या पोटनिवडणुकीने आजवरच्या सर्व निवडणुकांपेक्षा वेगळाच पायंडा पाडला आहे, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे.

शिवसेनेचा हक्‍काचा मतदारसंघ गेला

कोल्हापूर शहर मतदारसंघ हा एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्‍ला! 1990 च्या निवडणुकीनंतर या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व राहिले. त्यानंतर शिवसेनेचा हा हक्‍काचा मतदारसंघ झाला. आता मात्र शिवसेनेचा हा हक्‍काचा मतदारसंघ शिवसेनेच्या हातातून निसटला आहे. या ठिकाणी जो पक्ष विजयी होईल, तोच पक्ष या मतदारसंघावर आपला हक्‍क सांगणार, हे उघडच आहे.

संघर्षाची पार्श्‍वभूमी

या पोटनिवडणुकीला पार्श्‍वभूमी होती, ती भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्षाची! गेल्या सहा महिन्यांपासून दोन्ही बाजूंनी तोफा धडाडत होत्या आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर आणि समर्थकांवर ‘ईडी’ आणि ‘आयकर’ खात्याचे छापे पडत होते; तर भाजपच्या किरीट सोमय्यांसह काहीजणांवर पोलिस कारवाई होत होती. अशा चिघळलेल्या संघर्षाचे पडसाद या पोटनिवडणुकीच्या प्रचारात उमटणे स्वाभाविकच होते. त्यामुळे एका विधानसभा मतदारसंघातील ही पोटनिवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली.

आक्रमक प्रचार, आरोप-प्रत्यारोप

निवडणूक लढतीवेळचा सारा प्रचार दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या आक्रमक भाषणांनी गाजला. आरोप-प्रत्यारोपही झाले. प्रचारांच्या सभांना रणांगणाचे स्वरूप आले. कथित दगडफेकीचा गाजावाजा झाला. क्‍वचित सुसंस्कृत भाषेची मर्यादा ओलांडली गेली. कोल्हापूरने आजवर हजारो प्रचारसभा पाहिल्या; पण एवढा आक्रमक आणि टोकाला गेलेला प्रचार कधी ऐकला आणि पाहिला नव्हता. संयुक्‍त महाराष्ट्र चळवळ, सीमा चळवळीच्या घणाघाती सभांनी बिंदू चौक दणाणला आहे; पण त्या भाषणांत सरकारवर भडिमार होत होता, तरी प्रचाराची पातळी घसरली नव्हती.

नेत्यांचा फौजफाटा

एका पोटनिवडणुकीसाठी कोल्हापुरात संपूर्ण राज्यातील नेते मंडळींची मांदियाळी जमली होती. उपमुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्री, तीन माजी मुख्यमंत्री, दोन प्रदेशाध्यक्ष यांच्यासह अनेक आमदार, खासदार यांनी कोल्हापूरचा फड गाजवला. श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन पक्षकार्यही पदरी पाडून घेतले. एका पोटनिवडणुकीसाठी एवढी नेत्यांची फौज राबल्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. अर्थात, नेत्यांच्या भाऊगर्दीने पोलिसांची तारांबळ उडाली आणि नागरिकांना ट्रॅफिक जामचा त्रास सोसावा लागला, हा भाग वेगळा!

अभूतपूर्व चुरस

कोल्हापुरात 1952 पासून लोकसभा आणि विधानसभेच्या अनेक निवडणुका झाल्या; पण एवढी अभूतपूर्व चुरस प्रथमच अनुभवाला आली. 1977 मध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रचंड ईर्ष्येने निवडणूक झाली होती. काँग्रेसचे शंकरराव माने आणि शेकापचे दाजिबा देसाई यांच्यात ही लढत झाली. दाजिबा देसाई अवघ्या 165 मतांनी विजयी झाले, हे लक्षात घेतले तर या चुरशीची कल्पना येईल. त्यावेळी एका माजी नगराध्यक्षावर हल्‍ला होण्याचा आणि दोन समर्थक जमावांत दंगल उद्भवण्याचा प्रसंग ओढवला होता. यावेळी हातघाईवर कोणी आले नाही. मात्र, या निवडणुकीतील वातावरणाने जुन्या लोकांना 1977 ची लोकसभा निवडणूक आठवली आणि त्याहीपेक्षा ही निवडणूक चुरशीची झाल्याचे जाणवले.

दिग्गजांची कसोटी

महाविकास आघाडीला म्हणजे काँग्रेसला ही जागा टिकवायची आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या द‍ृष्टीने ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे; तर तिकिटासाठी प्रयत्न करणारे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची ही अग्‍निपरीक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या द‍ृष्टीनेही ही निवडणूक महत्त्वाची आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली सारी ताकद लावली आहे. आपल्या गृह जिल्ह्यात विजय मिळवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. एकूण चारही पक्षांच्या नेतृत्वाचा कस या निवडणुकीत लागणार आहे.

आगामी विधानसभेची रंगीत तालीम

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असाच सामना झाला तर कोल्हापूरची पोटनिवडणूक ही त्याची रंगीत तालीम ठरणार आहे. त्याद‍ृष्टीनेही ही पोटनिवडणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.

सुरेश पवार

Back to top button