हेअरड्रेसर बनायचंय? जाणून घ्या या क्षेत्रातील करिअर विषयी…. | पुढारी

हेअरड्रेसर बनायचंय? जाणून घ्या या क्षेत्रातील करिअर विषयी....

‘तेरे नाम’ या चित्रपटातील सलमान खान, ‘दिल चाहता है’, ‘गजनी’मधील आमीर खान आणि प्रीती झिंटा, ‘तारे जमीं पर’मधील आमीर खान, ‘क्रिश’मधील हृतिक रोशन या सर्वांच्यात साम्य काय? या सर्व चित्रपटांमध्ये या व्यक्‍तिरेखांच्या हेअरस्टाईल प्रचंड लोकप्रिय झाल्या. इतक्या की, त्या त्या काळामध्ये रस्त्यावर अनेक तरुण-तरुणी अशाच प्रकारच्या हेअरस्टाईल करून फिरत असल्याचे दिसत असे. ही किमया आपल्या आवडत्या हिरोची नाही… त्याने ती हेअरस्टाईल फक्‍त व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवली. ही खरी किमया आहे हेअरड्रेसर किंवा हेअर स्टायलिस्टची. दुसरी गोष्ट म्हणजे मेकअप… कमल हसनच्या कुठल्याही चित्रपटामधील मेकअप हे चर्चेचाच विषय ठरत असतात. शिवाय, मेकअपशिवायचे आपले सेलिब्रिटीज पाहिले, तर त्याची महती कळते.

हेअरड्रेसर आणि मेकअप आर्टिस्ट हे क्षेत्र करिअर म्हणून आव्हानात्मक आहे. त्यामध्ये तुमच्या हातातील कला आणि मेहनत करण्याची तयारी या दोन्ही गोष्टींचा संगम असावा लागतो. तसेच सतत काही तरी नवीन करण्याची इच्छाही असावी लागते. चित्रपटसृष्टीशी संबंधित काम करायचे असेल, तर मग आपल्या हाती आलेले कॅरेक्टर वाचणे आणि समजावून घेणेही आवश्यक असते.

या सर्वांची आता चर्चा करण्याचे एक कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला एक निर्णय. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये महिलांना मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करण्यास बंदी लादता येणार नाही. आतापर्यंत महिला मेकअप आर्टिस्ट फारशा दिसत नव्हत्या; पण न्यायालयानेच काम करण्यावरील बंदी हटविल्याने आता महिलांनाही मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याच निर्णयानुसार, पुरुषांनाही हेअरड्रेसर म्हणून काम करता येणार असल्याने या क्षेत्रातही चांगली संधी उपलब्ध होऊ शकतील.

हेअरड्रेसर म्हणजे केवळ केस कापणे इतक्यापुरतेच मर्यादित नाही. केसांना व्यवस्थित वळण कसे द्यायचे, त्यांची निगा कशी राखायची, त्या त्या व्यक्‍तीनुसार आणि तिच्या व्यक्‍तिमत्त्वानुसार कुठली केशरचना चांगली दिसू शकेल, याची जाणीव असणेही आवश्यक आहे. उभा चेहरा असलेल्या पुरुषास कोणती केशरचना चांगली दिसू शकेल आणि महिलेला कोणती केशरचना चांगली दिसेल, हा फरक करता येणे आवश्यक आहे. याचे व्यावसायिक प्रशिक्षणही उपलब्ध आहे. या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण घेणे खूप महत्त्वाचे आहे.

भारतामध्ये अनेक नामवंत हेअरड्रेसर्सने स्वत:च्या प्रशिक्षण संस्थाही सुरू केल्या आहेत. त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतल्यास आपल्याला चांगला अनुभवही मिळू शकतो.

हेअरड्रेसिंग म्हणजे केस कापणे इथपर्यंतच मर्यादित नाही. कारण, केसांची निगा कशी राखावी याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण या संस्थांमध्ये मिळू शकते. केसांवर कोणती रसायने वापरता येऊ शकतात, त्याचे काय परिणाम होतात आणि प्रत्येकाच्या केसाचा दर्जा सांभाळायचा कसा, याचे अनुभव यातून येतात. केसांचेही एक शास्त्र असते.

या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर हे शास्त्र माहीत करून घेणेही गरजेचे आहे. शिवाय, केसांसंदर्भातील रोग, त्यावरील उपाय या गोष्टीही माहिती असणे आवश्यक असते. त्यामुळे समोरच्या माणसाचे केस नेमके कसे आहेत, हे ओळखून आणि त्याच्या इच्छा जाणून घेऊन काम करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

भारतामध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देणार्‍या नामवंत हेअरड्रेसर्सच्या संस्थांमध्ये आपल्या गरजेनुसारचे प्रशिक्षण घेता येऊ शकते. काही संस्थांमध्ये दीड महिन्यापासून सहा महिन्यांपर्यंतचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिकांवरच जास्त भर दिलेला असतो. त्यामुळे आपल्याला या क्षेत्रातील प्रॅक्टिकल नॉलेज मिळू शकते. त्यानंतर आपल्या हातातील कौशल्य, मेहनत करण्याची तयारी आणि त्याला दिलेली नावीन्याची जोड यावर आपली प्रगती अवलंबून असते.

हेअरड्रेसर म्हणून आपण स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतो, काही हॉटेल्सशी टाय-अप करून तेथे सेवा देऊ शकतो, चित्रपट-मालिका-रंगभूमीवरही वेगवेगळ्या कामांचा अनुभव मिळवू शकतो.

अनिकेत प्रभुणे

Back to top button