पोलिसाच्या हल्ल्यातील सासर्‍याचा मृत्यू ; मृतदेह ताब्यात घेण्यास नकार | पुढारी

पोलिसाच्या हल्ल्यातील सासर्‍याचा मृत्यू ; मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील दोडी (बु.) येथे पोलिस सेवक सूरज देवीदास उगलमुगले याने पत्नीसह सासू-सासर्‍यावर केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सासरे निवृत्ती सांगळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, संशयितांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतल्याने काही वेळ गोंधळ उडाला होता.

पोलिसांनी हल्लेखोर सूरज याची आई अलका उगलमुगले हिच्यासह दापूर येथील नंदई संतोष आव्हाड यांना अटक केली असून, फरार सूरज व त्याच्या साथीदारालाही लवकरच अटक करण्याची ग्वाही दिल्याने नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस सेवक सूरज उगलमुगले याचा दोडी (बुद्रुक) येथील निवृत्ती दामोदर सांगळे यांची मुलगी पूजा हिच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना सात महिन्यांचा मुलगा असून, दोघे पती-पत्नी उपनगर नाशिक येथे वास्तव्यास आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्यासह नातेवाइकांनी रुग्णालयाकडे धाव घेत सूरज उगलमुगले यास अटक करावी, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. सूरजची पत्नी पूजा ही सूरजसह सासरच्यांकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून आठ दिवसांपूर्वी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेली होती. मात्र, तेथे तक्रार दाखल करून न घेतल्याने घटनेस तेथील अधिकार्‍यास जबाबदार धरून त्यांनाही निलंबित करावे, अशी मागणी यावेळी नातेवाइकांनी लावून धरली. सायंकाळी उशिरा दोडी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Back to top button