न्यूयॉर्क : पृथ्वीवर अब्जावधी प्रकारचे जीव-जंतू राहतात. यातील काही अत्यंत सूक्ष्म, तर काही महाकाय. हत्ती, हिप्पो हे मोठे जीव आपण नेहमीच पाहत असतो. मात्र, काही सागरी जीव यापेक्षाही किती तरी पटीने मोठे असतात. चित्रपटांमध्ये डायनासोर पाहून खरोखरच हे जीव किती मोठे होते? असा प्रश्न पडतो. मात्र, सध्या पृथ्वीवर असा एक जीव आहे की, तो डायनासोरपेक्षाही विशालकाय आहे. पृथ्वीवरील सर्वात मोठा जीव अशी ओळख असलेल्या 'ब्ल्यू व्हेल' असे या सागरी जीवाचे नाव. संशोधकांच्या मते, ब्ल्यू व्हेल प्रजातीची पाच कोटी वर्षांपूर्वी उत्पत्ती झाली आहे. तेव्हापासून ते आजही महासागरांमध्ये अस्तित्वात आहेत.
ब्ल्यू व्हेलची लांबी सुमारे 30 मीटर म्हणजे 98 फूट इतकी असू शकते. तर त्याचे वजन तब्बल 180 टन इतके असू शकते. आश्चर्य म्हणजे, या ब्ल्यू व्हेलच्या केवळ जीभेचे वजनच एका आफ्रिकन हत्तीच्या वजनाइतके असू शकते. सर्वसामान्यपणे माणसाच्या हृदयाचे वजन 250 ते 300 ग्रॅम इतके असू शकते. मात्र, ब्ल्यू व्हेलच्या हृदयाचे वजन तब्बल 180 किलोपर्यंत असू शकते. यामुळेच त्याच्या हृदयाचे ठोके तीन कि.मी.पर्यंत ऐकू जातात, असे म्हटले जाते.
एखाद्यावेळी माणसाला श्वास रोखून धरण्यास सांगितले तर तो फार तर 1 ते 2 मिनिटांपर्यंत श्वास रोखू शकतो. मात्र, ब्ल्यू व्हेल हा तब्बल 35 मिनिटे ते 2 तासांपर्यंत आपला श्वास रोखू धरू शकतात. भलेही हा जीव पाण्यात राहणारा असला, तरी तो पाण्यात श्वासोच्छ्वास करू शकत नाही. यासाठी त्याला काही सेकंदांसाठी का होईना पाण्याबाहेर यावेच लागते.
हेही वाचलंत का?