मुंबई-पुण्यात जे असेल ते नाशिकला हवेच : ना. छगन भुजबळ | पुढारी

मुंबई-पुण्यात जे असेल ते नाशिकला हवेच : ना. छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-पुण्याला नाशिक जोडल्यानंतर सुवर्णत्रिकोण पूर्ण होतो. याही पुढे जाऊन नाशिक उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे देशाच्या प्रमुख शहरांना जोडले गेले आहे. त्यामुळे मुंबई-पुण्याला जे जे मिळाले, ते ते नाशिकलाही मिळायला हवे. पश्चिम महाराष्ट्राबरोबरच उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या उत्तर महाराष्ट्र शाखेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र विकास परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुभाष देशमुख उपस्थित होते. भुजबळ म्हणाले की, पायाभूत सुविधांमध्ये मुंबई-पुणे अग्रक्रमांवर असून, नेस्ट डेस्टिनेशन नाशिक आहे. नाशिक कनेक्टिव्हिटीमध्ये आघाडीवर आहे. त्याचबरोबर स्किल वर्कर, पायाभूत सुविधा, हॉस्पिटल्स या ठिकाणी आहेत. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अधिकाधिक उद्योग यावेत, यासाठी मी प्रयत्नशील आहे.

गेल्या काही काळापासून उद्योजक अनेक संकटांचा सामना करीत आहेत. नोटाबंदी, जीएसटी, कोरोना या संकटातून उद्योजकांना जावे लागले आहे. पुढच्या काळात राज्यावर विजेचे संकट येण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात 30 हजार मेगावॉट विजेची मागणी वाढली आहे. त्यासाठी नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या संकटामुळे महाग वीज आपल्याला घ्यावी लागणार आहे. या घेतलेल्या विजेचा बोजा शेतकरी आणि उद्योजकांवर पडणार नाही याची दक्षता शासनाने घेतली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार देवयानी फरांदे, आमदार डॉ. राहुल आहेर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दशरथी, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हाधिकारी गंगाधरन डी., मनपा आयुक्त रमेश पवार यांच्यासह व्यापारी, उद्योजक व मान्यवर उपस्थित होते.

महिंद्रा बाहेर जाणे चूकच
नाशिकची मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीने आपला विस्तार नाशिक बाहेर करणे ही मोठी चूक असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मान्य केले. महापालिकेत वेगळ्या पक्षाची सत्ता, राज्यात वेगळी सत्ता यामुळे या बाबी घडत गेल्या. मात्र, नाशिकच्या विकासासाठी ती बाब नक्कीच परवडणारी नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button