

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी लोकवर्गणीतून जमा केलेले 58 कोटी रुपये हडप केल्याचा गुन्हा दाखल करणार्या मुंबई पोलिसांसमोर भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे चिरंजीव नील दोघेही शनिवारी हजर झाले नाहीत.
शनिवारी सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्याची नोटीस ट्रॉम्बे पोलिसांनी सोमय्या पिता-पुत्रांवर बजावली होती. मात्र, आपण कार्यालयीन कामकाजात व्यग्र असल्याने चौकशीला येण्यासाठी वेळ वाढवून मिळावा, अशी विनंती करणारे पत्र सोमय्यांनी आपल्या वकिलामार्फत पाठवले. त्यावर ट्रॉम्बे पोलीस आता सोमय्यांना पुन्हा कधी नोटीस पाठवतात, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
मानखुर्दचे माजी सैनिक बबन भोसले (53) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलिसांनी 7 एप्रिल रोजी सोमय्या पिता-पुत्रासह अन्य आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी माहिती हक्कानुसार राजभवनातून मिळालेल्या उत्तराचा आधार घेत सोमय्यांवर विक्रांत युद्धनौकेसाठीचा निधी हडप केल्याचा आरोप केला आणि त्यानंतर ही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली.
धर्मादाय आयुक्त?
आयएनएस विक्रांतच्या नावावर लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करणारे दोघेही बाप-बेटे पोलिसांसमोर जाण्यास घाबरत आहेत. म्हणूनच अटकपूर्व जामिनासाठी ते कोर्टात गेले. देवळात ठेवलेल्या पेटीचाही हिशेब धर्मादाय आयुक्तांना द्यावा लागतो. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनीही कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
58 की 140 कोटी?
किरीट सोमय्यांनी विक्रांतसाठी 58 कोटी रुपये गोळा केले व राजभवनात जमाच केले नाहीत, असा आरोप आहेे. मी फक्त प्रतीकात्मक आंदोलन केले. 35 मिनिटांत 58 कोटी जमतील कसे, असा सवाल त्यावर सोमय्यांनी केला. मात्र, सोमय्यांच्याच जुन्या ट्विटचा आधार घेत राऊत यांनी 58 कोटींचा आरोप आता 140 कोटी रुपयांवर नेऊन ठेवला आहे. त्यामुळे पोलीस काय तपास करतात यावर या आरोप-प्रत्यारोपांचे भवितव्य अवलंबून आहे.
पैसे गेले कुठे?
पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर हास्यास्पद असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. एका नागरिकाने वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे तक्रार नोंदवली. कोणताही पुरावा नाही. पोलिसांनी गुन्हा सिद्ध करावा, असे आव्हान त्यांनी दिले. मात्र, विक्रांतसाठी नेमका किती निधी जमवला होता आणि तो राजभवनात जमा केला नाही तर मग या निधीचे काय केले याचा खुलासा मात्र सोमय्यांनी आतापर्यंत केलेला नाही.