धुळे : हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण ; रखरखत्या उन्हात काढला मोर्चा | पुढारी

धुळे : हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण ; रखरखत्या उन्हात काढला मोर्चा

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा ; साक्री तालुक्यातील सामोडे ग्रामपंचायत हद्दीतील घोडमाळ परिसरातील संतप्त महिलांनी पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. यावेळी ग्रामसेवक बी. डी. चौरे, ए. पी. महाले यांना निवेदन देण्यात आले.

भर उन्हात महिलांनी तीन किलोमिटर पायी मोर्चा काढला

सामोडे-घोड्यामाळ येथील वॉर्ड क्रमांक एक व दोनमध्ये अनेक महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवते आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय होत असून, त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे महिलांनी डोक्यावर घागर घेऊन सरळ घोडमाळ ते सामोडे ग्रामपंचायतीपर्यंत तीन किलोमीटर पायी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.

महिलांनी प्रशासक महाले व ग्रामसेवक बी. डी. जगताप यांच्यासमोर समस्या मांडली. जोपर्यंत पाणीप्रश्न सुटत नाही तोपर्यंत जागेवरून हलणार नाही असा पवित्रा महिलांनी घेतला. यावेळी प्रशासक ए. पी. महाले व ग्रामसेवक जगताप यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून तातडीने नवीन बोअरिंग करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपक भारुडे, मा. पंस. सदश्य रावसाहेब घरटे, मुकुंद घरटे, संदीप शिंदे, अभय शिंदे, निकेश भदाणे, चंद्रकांत घरटे, किरण घरटे, पोलिस पाटील आदी उपस्थित होते. दोन ते तीन दिवसांत पाणीप्रश्न सुटला नाही तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी संतप्त महिलांनी दिला.  यावेळी ग्रामसेवक बी. डी. चौरे, ए. पी. महाले यांनी मध्यस्थी केली.

हेही वाचा :

Back to top button