Rishabh Pant Fined : चूकीला माफी नाही! ऋषभ पंतला १२ लाखांचा दंड | पुढारी

Rishabh Pant Fined : चूकीला माफी नाही! ऋषभ पंतला १२ लाखांचा दंड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने (LSG) दिल्ली कॅपिटल्सवर (DC) ६ गडी राखून विजय मिळवला. दिल्लीचा या हंगामातील हा दुसरा पराभव ठरला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) या पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार धरले. या पराभवासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरला आहे.

दरम्यान, सामना गमावल्यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला (Rishabh Pant) मोठा झटका बसला आहे. त्याच्यावर आयपीएल नियमावलीचे उल्लंघन झाल्याने त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्ली संघाला संघाला निर्धारित वेळेत षटके फेकता न आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. परिणामी कर्णधार असल्याने ऋषभ पंतला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएल साईटवर पंतला (Rishabh Pant) दंड केल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. स्लो ओव्हर रेटमुळे दंड आकारण्याची ही तिसरी घटना आहे. या हंगामात पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मावर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई करण्यात आली, जो दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध निर्धारित वेळेत षटक टाकू शकला नाही. यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वेळेत षटके टाकू शकले नाहीत आणि कर्णधार केन विल्यमसनलाही दंड ठोठावण्यात आला.

दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या पराभवाचा मोठा धक्का बसला असतानाच आता कर्णधार ऋषभ पंतवर (Rishabh Pant) झालेल्या कारवाईने त्या संघाची झोप उडाली आहे. आता त्यांना १२ लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीने चांगली सुरुवात केली. पृथ्वी शॉने झटपट अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे लखनौसमोर संघ मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. मात्र, शॉ बाद होताच संघाच्या धावसंख्येला ब्रेक लागला. दिल्लीकडे विकेट शिल्लक होत्या. पण, असे असतानाही फलंदाजांनी अतिशय संथ खेळ केला आणि परिणामी लखनौ सुपर जायंट्ससमोर जेमतेम १४९ धावा करण्यात समाधान मानावे लागले. प्रत्युत्तरात क्विंटन डी कॉकच्या ५२ चेंडूत ८० धावांच्या खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने १५९ धावांचे लक्ष्य सहज गाठले.

डेव्हिड वॉर्नर आणि आयनरिक नार्कियाच्या आगमनाने दिल्ली संघाला फारसा फायदा झाला नाही. या मोसमातील पहिल्याच सामन्यात दोन्ही स्टार खेळाडू निष्प्रभ ठरले. वॉर्नर फलंदाजीमध्ये प्रभाव पाडू शकला नाही. तो १२ चेंडूत केवळ ४ धावा करून बाद झाला. तर, नॉर्कियाला चेंडूसह कोणताही चमत्कार दाखवता आला नाहीत. दिल्लीचा पुढचा सामना आता रविवारी KKR विरुद्ध होणार आहे.

 

Back to top button