नाशिक : ‘बालभारती’चे भांडार व्यवस्थापक मद्यधुंद अवस्थेत रंगेहाथ पकडले | पुढारी

नाशिक : ‘बालभारती’चे भांडार व्यवस्थापक मद्यधुंद अवस्थेत रंगेहाथ पकडले

नाशिक/सिडको : पुढारी वृत्तसेवा
बालभारती कार्यालयातील भांडार व्यवस्थापक लक्ष्मण डामसे भरदुपारी कार्यालयातच मद्यप्राशन करत असल्याचा प्रकार शिवसैनिकांनी उघडकीस आणला आहे. अंबड पोलिसांनी डामसे यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी डामसे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. याबरोबरच चौकशीसाठी पुण्यावरून पथक नाशिकला दाखल झाले आहे.

लेखानगर येथील बालभारती कार्यालयाचे मुख्य भांडार व्यवस्थापक लक्ष्मण यशवंत डामसे गुरुवारी (दि. 7) दुपारी तीनच्या सुमारास कार्यालयातच मद्यप्राशन करत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. काही महिन्यांपासून डामसे मद्यपान करून महिला व इतर कार्यालयीन कर्मचार्‍यांनाही त्रास देत असल्याची तक्रार पुस्तकी अधीक्षक शुभांगी नांदखिले यांनी श्रमिक माथाडी व गार्डबोर्ड संघटनेच्या कार्यालयात केली होती.

त्यानुसार संघटनेचे पदाधिकारी सागर देशमुख, नीलेश साळुंके हे भांडार व्यवस्थापकांना भेटण्यासाठी गेले असता ते बालभारती कार्यालयाच्या वरती असलेल्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी कार्यालयीन वेळेत मद्यप्राशन करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडून त्यांची अंबड पोलिस ठाण्यात रवानगी केली. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखत बालभारतीने त्यांच्या चौकशीसाठी पुण्याहून दुपारी तीनला पथक नाशिकला पाठवले आहे. या पथकाने पाहणी करत डामसे यांचे तातडीने निलंबन करण्याचा निर्णय घेतला आहे.

बालभारतीच्या पथकाने केलेल्या पाहणीनुसार तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. त्याआधारे भांडार व्यवस्थापक लक्ष्मण डामसे यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
– कृष्णकुमार पाटील, संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन

हेही वाचा :

Back to top button