ढेबेवाडी; पुढारी वृत्तसेवा : विंग (ता. कराड) येथे मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. यावेळी या कळपाबरोबर असलेल्या घोड्याचा जागीच मृत्यू झाला. तर घोड्याचे शिंगरू गंभीर जखमी झाले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच ते शिंगरूही मृत झाल्याचे सांगण्यात आले.
याबाबत विंग ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार विंग येथील कणसे मळ्यात जगन्नाथ होगले यांच्या शेतात (गट नं.759) मध्ये शेतीला खत मिळावे, यासाठी कोळे येथील अक्षय भीमराव शिणगारे यांची मेंढरे बसविली होती. रात्री साधारणता 12 वाजण्याच्या सुमारास मेंढरांचे ओरडणे व घोड्यांच्या धडपडण्याच्या आवाजाने जाग आली. त्यावेळी पाहिले असता बिबट्याने घोड्यावर व शिंगरावरही हल्ला केल्याचे लक्षात आले. त्यात घोडा जागीच ठार झाल्याचे तर घोड्याचे शिंगरू गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत निदर्शनास आले.
कणसे मळ्यात बिबट्यांचा सातत्याने वावर असतो. दोन वर्षांत बिबट्याने कणसे मळ्यात पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याच्या काही घटना घडलेल्या आहेत. बिबट्याचा बंदोबस्ताची विंग ग्रामस्थांची मागणी जुनीच आहे, पण वन विभाग याकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळेच स्थानिकांकडून वन विभागाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.