नाशिक : शेतमजुराच्या खुनाची उकल ; संशयित आरोपी हिरामण पवारला अटक

खुनाची उकल
खुनाची उकल
Published on
Updated on

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
शहराजवळील कंधाणे फाटा येथील मोरेनगर शिवारात झालेल्या शेतमजुराच्या खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित हिरामण नामदेव पवार (40, रा. मळगाव, हल्ली मुक्काम कंधाणे फाटा, मोरेनगर शिवार) यास अटक केली आहे. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी गुरुवारी (दि. 7) नाशिक येथे पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

मोरेनगर शिवारात 3 एप्रिलला हॉटेल गुरुकृपाच्या मागील मोकळ्या जागेत घमजी रंगनाथ माळी (45, रा. मोरेनगर शिवार, मूळ रा. पिंगळवाडे) यांचा मृतदेह मिळून आला होता. अज्ञाताने डोक्यात दगड घालून जीवे ठार मारल्याचे स्पष्ट होत होते. याबाबत सटाणा पोलिसात खुनाच्या गुन्ह्याची नोंद झाली. पोलिस अधीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तपासाची चक्रे फिरवली. पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. माळी याचे दैनंदिन कामकाज व राहण्याच्या ठिकाणाबाबत माहिती घेतली. त्याचे कोणाशी वैर किंवा वाद आहे काय? याबाबत गोपनीय माहिती घेण्यात आली. या दरम्यान, घटनास्थळापासून अवघ्या 15 फुटांवर वास्तव्यास असणार्‍या हिरामण पवार व त्याच्या कुटुंबीयांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या हालचालीदेखील संशयास्पद वाटल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.

कौशल्यपूर्ण केलेल्या चौकशीत पवारने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार माळी हा मद्यपी होता. रोज सायंकाळी तो सटाणा येथे जाऊन मद्यप्राशन करायचा. 'त्या' 2 एप्रिलच्या सायंकाळीही तो नित्यनेमाने गेला होता. रात्री दहा ते अकराच्या दरम्यान मद्यधुंद अवस्थेत माळी हा हिरामण पवार यांच्या घरी गेला. त्याला पाहून संताप अनावर झालेल्या हिरामण याने माळीच्या डोक्यात बाटली मारली. तो खाली पडला. त्यानंतर मोठा दगड उचलून तो माळी याच्या डोक्यात घातला. वर्मी घाव बसल्याने माळी जागीच गतप्राण झाला, असा घटनाक्रम संशयिताने सांगितला आहे.

संशयित आरोपी हिरामण यास अटक झाली असून, न्यायालयासमोर हजर करून त्याची पोलिस कोठडी घेण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक अनमूलवार करीत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक किरण पाटील, पोलिस उपनिरीक्षक राहुल गवळी, हवालदार हेमंत कदम, जिभाऊ पवार, पोलिस नाईक अजय महाजन, अतुल आहेर, विजय वाघ, बाळासाहेब निरभवणे तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विशेष योगदान दिले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news