वर्षा गायकवाड : शिक्षकांच्या गोंधळामुळे शिक्षणमंत्र्यांनी आढावा बैठक गुंडाळली; निवेदनांचा पाऊस | पुढारी

वर्षा गायकवाड : शिक्षकांच्या गोंधळामुळे शिक्षणमंत्र्यांनी आढावा बैठक गुंडाळली; निवेदनांचा पाऊस

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी आढावा बैठक झाली. निवेदने देण्यासाठी व्यासपीठावर शिक्षकांनी मोठी गर्दी केल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे मंत्री वर्षा गायकवाड आढावा बैठक गुंडाळून निघून गेल्या.

हॉटेल सयाजी येथे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक झाली. काही शिक्षक संघटना नेत्यांनी विरोध केल्यावर व्यासपीठावर लावलेला प्रचार बैठकीचा डिजिटल फलक काढण्यात आला. प्रास्ताविक प्रा. आ. जयंत आसगावकर यांनी सरकारची शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका असल्याचे सांगितले. यावेळी कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या उमेदवार जयश्री जाधव आढावा बैठकीत आल्या.

त्या म्हणाल्या, आ. जाधव यांनी शहराच्या विविध विकासकामे केली. शिक्षकांचे प्रश्न ते मांडत होते. त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निवडणुकीत उभी आहे. शिक्षक, संघटना नेत्यांनी भाषणाअगोदर शिक्षकांचे प्रश्न मांडू द्या. मगच सर्व प्रश्नांचे उत्तर द्या, अशी भूमिका घेतली.

यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, शिक्षकांचे सर्व प्रश्न माहीत आहेत. मी दिवसभर कोल्हापुरात आहे, त्यावेळी संघटना पदाधिकार्‍यांबरोबर चर्चा करू. राजेंद्र कांबळे यांनी सेवा ज्येष्ठता मुद्दा मांडला. त्यानंतर शिक्षक बँकेचे नेते राजाराम वरूटे यांनी जि. प. शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. शिक्षण की ग्रामविकास विभाग असा गोंधळ सुरू आहे.

प्राथमिक शिक्षकांची एकही बैठक लावली नाही, असे सांगितले. यावेळी मंत्री गायकवाड यांनी शिक्षक असताना शिस्त पाळत नाहीत, मग कसे होणार असे बोल शिक्षकांना सुनावले. त्यानंतर विविध शिक्षक संघटना नेत्यांनी व्यासपीठावर जाऊन निवेदने देण्यासाठी गर्दी केली. त्यावेळी मंत्री गायकवाड गोंधळातच निवेदेन सत्कार स्वीकारत सभागृहातून निघून गेल्या. स्वागत भरत रसाळे यांनी केले. यावेळी विविध संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button