खटाव ; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे आणि माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गुरुवारी दिल्लीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेचा पीएमकेएसवायमध्ये समावेश करुन 247 कोटींचा निधी दिल्याबद्दल तसेच पंढरपूरकडे जाणार्या पालखीमार्गाचे काम मार्गी लावल्याबद्दल दोघांनी मोदींचे आभार मानले. जिहे-कठापूर योजनेच्या जलपूजनाला येण्याचे निमंत्रणही मोदींना देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे आणि खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दि. 1 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेच्या रखडलेल्या कामांबाबत सादरीकरण केले होते. ही योजना माण आणि खटाव तालुक्यांसाठी जलसंजीवनी ठरणार असल्याने योजनेची उर्वरित कामे त्वरित होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राच्या प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत जिहे-कठापूरचा समावेश करण्याची विनंतीही दोघांनी मोदींना केली होती. पंतप्रधानांनीही लगेच जलशक्ती मंत्रालयाला आदेश देऊन केंद्राचा निधी देण्याच्या सुचना दिल्या होत्या.
मोदींच्या आदेशानंतर त्वरित हालचाली होवून त्यांच्याच गुरुंच्या नावाने प्रगतीपथावर असणार्या जिहे-कठापूर योजनेचा समावेश पीएमकेएसवायमध्ये करुन 247 कोटींचा निधीही जाहीर केला. त्यातील सहा कोटी रुपये वर्गही करण्यात आले. कायम श्रेयवादात अडकून रखडकेल्या जिहे-कठापूर योजनेची उर्वरित कामे करण्यासाठी सहाशे कोटींपेक्षा अधिक निधीची गरज आहे. राज्याकडून इतका मोठा निधी उपलब्ध होणे शक्य नसल्याने केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी आ. गोरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती.
जिहे-कठापूर योजनेसाठी केंद्रच्या जलशक्ती मंत्रालयाने निधी उपलब्ध केल्याबद्दल खा. निंबाळकर, आ. गोरे यांनी आ. राहुल कुल, आ. सदाभाऊ खोत यांच्यासह मोदींची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. महाराष्ट्रातील राज्यसरकारच्या तसेच खासकरुन पोलिस खात्याच्या चुकीच्या कारभाराबाबत खा. निंबाळकर, आ. गोरे आणि शिष्टमंडळाने मोदींसमोर तक्रारींचा पाढा वाचला.
मोदींना निमंत्रण, अमित शहा, राजनाथसिंहांचीही भेट
पंतप्रधानांचे गुरु खटावचे लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव जिहे-कठापूर योजनेला भाजपच्या कार्यकाळात देण्यात आले होते. या योजनेच्या जलपूजनाला येण्याचे निमंत्रण भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आ. गोरे आणि खा. निंबाळकर यांनी मोदींना दिले. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन ग्रामीण भागातील सहकारावर चर्चा केली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांचीही दोघांनी सदिच्छा भेट घेतली.