जळगाव ; पुढारी वृत्तसेवा: जळगाव येथील गुरुकुल अकादमीमधून २० वर्षीय तरुण भारतीय सैन्यात भरती होण्यासाठीची पूर्व परीक्षा देवून घरी परतत असताना पाचोरा तालुक्यातील नेरी- भामरे येथे पिकअप चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत युवकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागेवरट ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक महिती अशी की, तेजस सुरेश महेर (वय २०) असे मृत युवकाचे नाव असून तेजस कन्नड तालुक्यातील नागद गावाजवळील पांगरे गावात राहत होता. तेजसचे सैन्यात भरती होवून देशसेवा करण्याचे स्वप्न असल्याने त्याने जळगाव येथील गुरुकुल अकॅडमीत प्रवेश घेतला होता. अकॅडमीचा सैन्यभरती पूर्व परीक्षाचा शेवटचा पेपर देवून बुधवारी ( दि. ६ एप्रिल) रोजी पाचोरा तालुक्यातील लोहटार येथे तेजस मुक्कामी थांबला.
यानंतर आज गुरूवारी (दि. ७ एप्रिल) रोजी सकाळी लोहटार येथून नातेवाईकांची मोटारसायकलने पांगरे (ता. कन्नड) येथे जात असताना चाळीसगाव तालुक्यातील भामरे गावाजवळ मालवाहू चारचाकी वाहनाने मागवून त्यास जोरदार धडक दिली. वाहनाच्या जोरदार धडकेने तेजस हा जागेवर कोसळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि तो जागेवर ठार झाला.
अपघाताची माहिती मिळताच भामरे गावातील काही नागरीकांनी घटनास्थळी धाव घेऊन चारचाकी वाहन चालकास चोप देऊन तेजसच्या मोबईलवरून त्याच्या बहिणीला फोन केला आमि या घटनेची माहिती दिली. तेजसच्या पाश्चात्य आई, वडिल व एक बहिण असा परिवार आहे. तेजस हा आई -वडिलांना एकुलता एक मुलगा होता.
या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात येवून हंबरडा फोडला. तेजसवर पांगरा (ता. कन्नड) येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मात्र तेजसचे सैन्यात भरती होवून देशसेवा करण्याचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले.
दरम्यान, या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरचा गुन्हा शुन्य क्रंमाकाने कन्नड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तेजसचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
हेही वाचलंत का?