अर्जुन नलवडे, पुढारी ऑनलाईन : राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) आठ परिक्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर असून, तितक्याच मोठ्या प्रमाणात कारवाईदेखील होताना दिसून येत आहे. सापळा, अपसंपदा आणि अन्य भ्रष्टाचार या तीन प्रकारांमधील 'सापळा' प्रकारात प्रशासकीय नोकरदारांकडून झालेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे अधिक असल्याचे विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या जानेवारी २०२२ ते मार्च २०२२ पर्यंतच्या आकडेवारीत दिसून येत आहे.
सन २०२२ च्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये 'लाचलुचपत'ची एकूण १९६ समोर आली आहेत. त्यामध्ये 'सापळा' या प्रकारात १९२ प्रकरणे, 'अपसंदा' या प्रकारात केवळ ३ आणि 'अन्य भ्रष्टाचार' या प्रकारात १ प्रकरण उघडकीस आले. एकूण आकडेवारी ही १९६ वर जात असून त्यामध्ये सापळा या प्रकारात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.
परिक्षेत्र निहाय आकडेवारीचा विचार करता असे लक्षात येते की, मुंबईत सापळा या प्रकारात एकूण २१ गुन्ह्यांची नोंद झाली, तर त्यामध्ये ३२ आरोपी आढळले. अपसंपदा प्रकारात ३ गुन्हे नोंदविली गेली, त्यातील तिन्हीही आरोपी आढळले. ठाणे परिक्षेत्रात सापळा प्रकारात एकूण २५ गुन्ह्यांची नोंद, तर आरोपी ३४ आढळले. पुण्यात एकूण २९ गुन्ह्यांची नोंद झाली, तर त्यातील ३७ आरोपी आढळले. नाशिकमध्ये एकूण ३२ गुन्ह्यांची नोंद असून त्यातील ४७ आरोपी आढळले.
नागपूर परिक्षेत्रात एकूण १३ गुन्ह्यांची नोंद झाली, तर त्यातील १७ आरोपी आढळले. अमरावतीमध्ये एकूण १५ गुन्ह्यांची नोंद झाली, तर २१ आरोपी आढळले. औरंगाबादमध्ये सापळा या प्रकारात एकूण ३१ गुन्ह्यांची नोंद झाली, तर ४० आरोपी आढळले. तसेच औरंगाबादमध्ये अन्य भ्रष्टाचार प्रकारात १ गुन्हे नोंद झाला आहे, तर १ आरोपी आढळला आहे. नांदेड परिक्षेत्रात सापळा या प्रकारात एकूण २६ गुन्ह्यांची नोंद झाली, तर ३२ आरोपी आढळले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्च या महिन्यांत राज्याच्या ८ परिक्षेत्रांमध्ये एकूण १९६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर त्यामध्ये प्रत्यक्ष २६४ आरोपी आढळून आलेले आहेत. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लाच घेण्याऱ्या प्रकरणांमध्ये नाशिक परिक्षेत्रचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद परिक्षेत्र आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर पुणे परिक्षेत्र आहे.
लाच स्वीकारता, मागणी करताना किंवा लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एखाद्या शासकीय नोकरदारास रंगेहात पकडणे म्हणजे 'सापळा' होय.
शासकीय नोकरदाराने भ्रष्टाचारामार्फत आपल्या उत्पन्नापेक्षा अधिकची मालमत्ता मिळवणे. त्या मालमत्तेसंदर्भात प्रश्न विचारल्यास असमाधानकारक उत्तरे देणे म्हणजे 'अपसंपदा' होय.
सार्वजनिक विकासासाठी असलेला निधी किंवा अनुदान शासकीय नोकरदार स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असल्यास, अशा प्रकरणांची नोंद ही 'अन्य भ्रष्टाचार' या प्रकारात होते.