धुळे; पुढारी वृत्तसेवा : शिरपूर तालुक्यातील सावळदे येथे बनावट नोटा छापण्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या 425 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
शिरपूर लगतच्या सावळदे येथील घरात बनावट नोटांची छपाई होत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या पथकाने सावळदे येथे संशयिताच्या घरावर छापा टाकला. यावेळी या घरात बनावट नोटा छपाई करण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर तसेच अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी सावळदे येथे राहणारे मुकेश पल्हाद कोळी आणि धनंजय दिलीप शिरसाठ या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 500 रुपये किमतीच्या 425 बनावट नोटा जप्त केल्या आहेत. यातून अटक केलेला धनंजय शिरसाट हा उच्चशिक्षित आहे. त्यांनी सिविल इंजीनियरिंग पर्यंतचे शिक्षण घेतले असून, त्याला अपेक्षित नोकरी न मिळाल्याने त्याने झटपट श्रीमंत बनण्याकरता असा व्यवसाय निवडला असावा असा संशय व्यक्त केला जातो आहे. आज झालेल्या या कारवाईमुळे या बनावट नोटा छापणाऱ्या तुकडीने मोठ्या प्रमाणावर हे रॅकेट चालवले असावे असा पोलिसांना संशय असून त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे.