नाशिक : बोगस जामिनधारांकडून न्यायालयांची फसवणूक ; इतक्या जणांविरोधात गुन्हा | पुढारी

नाशिक : बोगस जामिनधारांकडून न्यायालयांची फसवणूक ; इतक्या जणांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जामीनदार म्हणून न्यायालयात हजर राहणार्‍या व तोतया जामीनदारांसाठी बनावट कागदपत्रे तयार करून देणार्‍या 20 जणांविरोधात सरकारवाडा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या संशयितांनी मार्च ते ऑक्टोबर 2021 या कालवधीत विविध न्यायालयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

फसवणुकीचा हा प्रकार जिल्हाभरात फैलावल्याचा अंदाज आहे. रवींद्र गंगाधर गाडेकर (45, रा. उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार 1 मार्च ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत विविध न्यायालयांमध्ये 81 जामीन प्रकरणांमध्ये 17 व्यक्ती जामीनदार म्हणून हजर राहिल्या. त्यासाठी या व्यक्तींनी बनावट दस्त व खोट्या स्वाक्षर्‍या करून वेगवेगळ्या नावे जामीनदार म्हणून हजर राहिल्याचेही आढळून आले. या 17 जामीनदारांसाठी बनावट दस्तऐवज बनवून देण्यासाठी इतर तिघांनी मदत केल्याचेही समोर आले.  त्यामुळे या 20 जणांनी मिळून बनावट दस्ताच्या आधारे विविध प्रकरणांमध्ये जामीनदार म्हणून न्यायालयात हजर राहून विविध न्यायालय व मुख्य दंडाधिकारी कार्यालयाची फसवणूक केल्याचे समोर आले. सरकारवाडा पोलिस ठाण्यात 20 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यांच्याविरोधात गुन्हा दाखल
जामीनदार म्हणून रिना ऊर्फ नीता नवले (रा. रविवार पेठ), मंगल संजय वाघ (रा. पेठ गल्ली, गंगापूर गाव), युवराज नानाजी निकम (रा. खामखेडा, ता. देवळा), मधुकर जाधव (रा. पिंपळगाव बहुला), लक्ष्मण एकनाथ खडताळे (रा. गोवर्धन), राधिका ऊर्फ रजिया शकिल खाटील (रा. पाथर्डी गाव), इकबाल पिंजारी (रा. वडाळा गाव), पंरा, राजू वाघमारे (रा. त्र्यंबकेश्वर), रवि मोतीराम पाटील (रा. मातोरी) यांच्यासह संशयितांना बनावट दस्तऐवज तयार करून देणारे कल्पना पाटील, इमरान पिंजारी व जावेद पिंजारी यांच्यासह एकूण 20 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा :

Back to top button