कोलंबो; पुढारी ऑनलाईन
श्रीलंकेतील (Sri Lanka) आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका क्रिकेट टीमचे माजी कर्णधार सनथ जयसूर्या (former cricketer Sanath Jayasuriya) यांनी चिंता व्यक्त केली आहे. श्रीलंकेतील सध्याची परिस्थिती भयावह असल्याचे सांगत जर देशातील लोकांच्या समस्यांचे योग्य प्रकारे निवारण केले नाही तर श्रीलंका उद्ध्वस्त होईल, अशी भिती जयसूर्या यांनी व्यक्त केली आहे. जयसूर्या यांनी श्रीलंकेतील गंभीर आर्थिक संकटावरुन सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या देशातील लोकांचे समर्थन केले आहे.
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना, जयसूर्या यांनी देशाची परिस्थिती दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. आमचा शेजारी देश आणि मोठा भाऊ असलेल्या भारताने आमची नेहमी मदत केली आहे. आम्ही भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
"सध्याच्या परिस्थितीत इथल्या लोकांना जगणे कठीण जात आहेत. देशात इंधन, गॅसची टंचाई आहे आणि कधी कधी १० ते १२ तास वीज नसते. त्यामुळेच लोक पुढे येऊन निदर्शने करत आहेत. जेव्हा आपलेच लोक त्यांच्याच सरकारविरोधात आंदोलन करतात तेव्हा मला खूप वेदना होतात," असे जयसूर्या यांनी म्हटले आहे.
"शांततेच्या मार्गाने लोकांनी निदर्शने करावीत. हिंसक होऊ नका. हे खऱ्याखुऱ्या लोकांचे आंदोलन आहे जे समोर येऊन त्यांना होणारा त्रास सरकारला सांगत आहेत," असेही त्यांनी पुढे नमूद केले आहे.
"सध्याची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी सरकारची आहे. श्रीलंकेच्या लोकांना खूप विश्वास होता. सध्याच्या सरकारने गेल्या तीन चार महिन्यात जे काही केले आहे ते योग्य नाही. सर्व लोक सध्याच्या सरकारला दोष देत आहेत," असे त्यांनी म्हटले आहे.
जयसूर्या पुढे म्हणाले की, मी स्वतः देशातील बिघडलेली परिस्थिती पाहिली आहे. देशातील लोकांना जीवनाश्यक वस्तू मिळण्यात अडचणी येत आहेत. आर्थिक संकटामुळे लोकांच्या सुरू असलेल्या संघर्षाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, "आम्हाला सध्याची परिस्थिती पहायला होत नाही. डिझेल, गॅस आणि दूध पावडरसाठी ३-४ किलोमीटर रांगा लागत आहेत. हे खरोखर दु:खद आहे आणि या क्षणी लोक दुखावले आहेत." अशी भावना जयसूर्या यांनी व्यक्त केली आहे.
लोक त्यांच्या हक्कांसाठी बाहेर पडत आहेत. म्हणूनच मी आधीही सांगितले होते की जर परिस्थिती योग्यरित्या हाताळली नाही तर आपत्ती निर्माण होईल, असा इशारा सनथ जयसूर्या यांनी दिला आहे.
हे ही वाचा :