कोकणात रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध, ठराव बहुमताने मंजूर | पुढारी

कोकणात रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध, ठराव बहुमताने मंजूर

राजापूर ; पुढारी वृत्तसेवा : राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या बाबतीत ग्रामस्थांच्या मतांची चाचपणी करण्यासाठी आयोजित केलेल्या ग्रामसभेत रिफायनरीविरोधी ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. यामध्ये परिसरातील ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला.

रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात 466 मते, रिफायनरीच्या समर्थनार्थ 144 मते पडली तर 23 जण तटस्थ राहिले. दरम्यान, ज्या बारसू गावात हा प्रकल्प होणार आहे त्या गावातील ग्रामस्थांनी तटस्थ राहत रिफायनरीबाबत दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प नाणार येथून रद्द झाल्यानंतर बारसू-सोलगाव परिसरात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पाला स्थानिकांतून समर्थन मिळत असताना राज्य शासनही या प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याचे पुढे आले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू-सोलगाव येथील 13 हजार एकर जागेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविल्यानंतर या परिसरातून विरोध होण्यास सुरुवात झाली आहे.

या पार्श्वभूमीवर धोपेश्वर ग्रा. पंचायतीची रिफायनरी समर्थन आणि विरोधाच्या मुद्यावर विशेष ग्रामसभा बुधवारी श्री धूतपापेश्वर मंगल कार्यालय येथे पार पडली. या ग्रामसभेत धोपेश्वर ग्रामपंचायत नजीक येणार्‍या गावांमधील ग्रामस्थांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत मत नोंदविण्यात आले. सकाळी 11 वाजता मतदानाला सुरूवात झाली.

सकाळपासूनच मतदानासाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये रिफायनरी विरोधकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत मतदान केले. दुपारी 2 वाजेपर्यंत ही मदान पकीया पार पडली. यामध्ये रिफायनरीच्या विरोधात 466 मते, रिफायनरीच्या समर्थनार्थ 144 मते पडली तर 23 जण तटस्थ राहिले.

दरम्यान, ज्या बारसू गावात हा प्रकल्प होणार आहे, जेथील लोकांची जमिन या प्रकल्पात बाधित होणार आहे तेथील ग्रामस्थांनी या मतदानात सहभाग न घेता लवकरच आम्ही रिफायनरी प्रकल्पाबाबत दोन्ही बाजू ऐकून घेऊन आमच्या गावचा निर्णय जाहीर करू, अशी भूमिका घेतली आहे.

Back to top button