रत्नागिरी : ‘जे.के. फाईल’ने 420 कामगारांना काढले | पुढारी

रत्नागिरी : ‘जे.के. फाईल’ने 420 कामगारांना काढले

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : रेमंड ग्रुपच्या रत्नागिरीतील जे.के. फाईल्स कंपनीमधील सुमारे 420 कंत्राटी कामगारांना तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेने कामगारांच्या बाजूने उभे राहत जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कंपनी व्यवस्थापनाला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशाराच मनसे कामगार सेनेने दिला आहे.

जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र, यातून मार्ग न निघाल्यास कंपनीच्या रत्नागिरीसह ठाण्यात मनसेचे खळखट्याक आंदोलन होईल, असा इशारा मनसेच्या कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिला.

जे.के. फाईल कंपनीतील काही कामगारांना ज्या समस्या भेडसावत होत्या. त्याबाबत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे कामगार सेनेने पुढाकार घेतला. कंपनी व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा झाली. मात्र, बैठकीत अधिकारी बोलले एक, मात्र केले दुसरेच, असा आरोपही राणे यांनी यावेळी केला. या कर्मचार्‍यांनी दिवसरात्र काम केले आहे. मात्र, त्यांना वेळेवर पगार दिला जात नव्हता. नियमित कामगारांची कामेदेखील त्यांना करावी लागत होती. कामगारांना शूज, हॅण्डग्लोव्हजसह सेफ्टीसाठी कोणतेच साहित्य दिले जात नव्हते. साधा युनिफार्म ठेकेदाराकडून दिला गेला नाही, याचा जाब मनसेने विचारला. त्यानंतर कामगारांना काढून टाकण्यात आले.

बैठक सकारात्मक झालेली असताना अचानक स्थानिक व्यवस्थापनावर कोणाचा दबाव आला? मनसे कामगार सेनेचा धसका नेमका कोणी घेतला? याचा शोध घेतला जाणार आहे. कोणाच्या दबावाने कामगारांना घरी बसवले? याची पाळंमुळं खोदून काढणार असल्याचे गजानन राणे यांनी यावेळी सांगितले.

कामगारांवर अन्याय होऊ नये, यासाठी सुरुवातीचे पाऊल आम्ही सनदशीर मार्गाने टाकले आहे. यासाठी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना त्याबाबतचे निवेदन दिले आहे. 8 दिवसांत बैठक घेऊन यावर तोडगा काढू, असे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही कामगारांसाठी संयमाची भूमिका दाखवली आहे. याचा गैरफायदा कंपनी व्यवस्थापनाने घेऊ नये. रत्नागिरीत कंपनीबाहेर कामगारांचे आंदोलन होईल आणि तिकडे ठाण्यातील मुख्यालयात या आंदोलनाचे पडसाद उमटतील, असा इशाराच राणे यांनी दिला आहे. आज 400 कुटुंबं उघड्यावर आली आहेत. स्थानिक तरुण उद्ध्वस्त होणार आहे. या कामगारांना न्याय मिळवून देणारच, असा इशाराच गजानन राणे यांनी दिला आहे. यावेळी मनसेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क अधिकारी अमोल साळुंखे, मनसेचे विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष गुरू चव्हाण, चैतन्य शेंडे यांच्यासह जे.के. चे कामगार उपस्थित होते.

Back to top button