‘त्या’ 8 जणांना जन्मठेप: किलर बन्‍नंजे राजाचा समावेश; एकाला 5 वर्षे शिक्षा | पुढारी

‘त्या’ 8 जणांना जन्मठेप: किलर बन्‍नंजे राजाचा समावेश; एकाला 5 वर्षे शिक्षा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : तीन कोटींच्या खंडणीसाठी उद्योजक आर. एन. नाईक यांचा खून करणार्‍या बन्नंजे राजा या सुपारी किलरसह 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर एका गुन्हेगाराला पाच वर्षांचा सश्रम कारावास सुनावण्यात आला. कोक्‍का (कर्नाटक कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज्ड क्राईम अ‍ॅक्ट अर्थात संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा) न्यायालयाचे न्यायाधशी सी. एम. जोशी यांनी सोमवारी हा निकाल जाहीर केला.

उद्योजक नाईक यांनी तीन कोटी रुपये खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे 21 डिसेंबर 2013 रोजी नाईक यांचा अंकोला येथे गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. हा खून आपल्या सांगण्यावरून करण्यात आल्याची माहिती बन्‍नंजे राजाने स्वतःहून प्रसारमाध्यमांना दिली होती.बेळगावातील कोक्‍का न्यायालयात सात वर्षे खटला चालला. बन्‍नंजे राजा याच्यासह 9 जणांना 30 मार्च रोजी दोषी ठरवण्यात आले होते. त्यांना शिक्षा सोमवारी सुनावण्यात आली.

जगदीश पटेल (उत्तर प्रदेश), अंबी बंडगार, गणेश बजंत्री (उडुपी), महेश अच्चंगी (हासन), संतोष एम. बी. (केरळ), बन्‍नंजे राजा, जगदीश चंद्रराज (बंगळूर), अंकीतकुमार कश्यप (उत्तर प्रदेश) यांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला. कोक्‍कांतर्गत ही कारवाई करण्यात आली. तर इस्माईल एम. के. (केरळ) याला पाच वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

फाशीसाठी उच्च न्यायालयात दाद

कोक्‍कांतर्गत दाखल केलेल्या या गुन्ह्याचे स्वरूप खूप गंभीर आहे. त्यामुळे सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी होती. तिघांना निर्दोष सोडण्यात आले. त्यामुळे या निकालाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी माहिती सरकारी वकील अ‍ॅड. के. जी. पुराणिकमठ यांनी दिली.

बन्नंजे राजा सापडला होता मोरोक्कोत

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

उद्योजक आर. एन. नायक खून खटल्याचा सूत्रधार बन्नंजे राजा खुनानंतर दोन वर्षे फरार होता. तो सापडला ते मोरोक्कोत, तेही खुनाच्या गुन्ह्यात नव्हे, तर बनावट पासपोर्ट प्रकरणात बन्नंजे राजाच्या सूचनेनुसार, नाईक आणि त्यांचा संरक्षक रमेश गौडा यांच्यावर उत्तर प्रदेशहून आलेला शार्पशूटर विवेक उपाध्याय याने गोळ्या झाडल्या. त्यात नाईक ठार झाले. तर संरक्षक रमेश गौडा याने प्रत्त्युतरादाखल केलेल्या गोळीबारात शार्पशूटर उपाध्यायचा मृत्यू झाला.

या प्रकरणात बन्‍नंजे राजासह 16 जणांवर दोषारोप ठेवण्यात आले होते. उत्तर परिक्षेत्र पोलिस संचालकांनी हे प्रकरण कोक्‍कांअतर्गंत दाखल केले होते. 16 संशयितांपैकी तिघे जण अद्याप फरार आहेत. तर तिघे दोषमुक्त झाले असून, एकट्याचे निधन झाले आहे.

बन्‍नंजे राजा याला 2015 साली मोरोक्‍को येथून कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बारा साथीदारांसह तो हिंडलगा येथील कारागृहात आहे. या प्रकरणातील तिघांची निर्दोष मुक्तता झाली आहे. तर 9 जणांना आज शिक्षा बजावण्यात आली आहे. या निकालादरम्यान न्यायालय आवारात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विशेष सरकारी वकील अ‍ॅड. के. जी. पुराणिकमठ म्हणाले, या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रताप रेड्डी, आलोक कुमार, भास्कर राव, अण्णा मलाई यांच्यासह 210 जणांच्या साक्षी झाल्या आहेत. 1027 कागदपत्रे आणि 138 मुद्देमाल तपासण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button