ईडीने एकदाच बोलावले अन् इंजिन वेगळ्या ट्रॅकवर गेले ; भुजबळांचा राज यांच्यावर पलटवार

छगन भुजबळ,www.pudhari.news
छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाजपला कडवा विरोध करणार्‍या राज ठाकरे यांनी अचानक टर्न कसा काय घेतला, हे कळले नाही. त्यांनी माझ्यावरही टीका केली आहे. ईडीने एकदा बोलावले काय आणि 'इंजिन' वेगळ्याच ट्रॅकवर गेले. कोहिनूर टॉवर हलायला लागला की काय, अशा खोचक शब्दांत अन्न व नागरी पुरवठामंत्री ना. छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला.

मुंबईतील शनिवारच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर चौफेर टीका केली होती. तसेच शिवसेनेसह राष्ट्रवादीवरही तोंडसुख घेतले होते. 'छगन भुजबळ तुरुंगात जाऊन येऊनही त्यांना मंत्री कसे केले', असा सवाल उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.3) ना. भुजबळ यांनी राज यांच्या या टीकेला सडेतोड उत्तर दिले. मेळावा नक्की मनसेचा होता की भाजपचा, असा बोचरा प्रश्न करीत त्यांनी राज ठाकरे यांचे हिंदीप्रेम कुठून आले, अशीही विचारणा त्यांनी केली.

राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या जातीयवादाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भुजबळ म्हणाले की, धर्मवाद व जातीयवाद कोणी वाढवला, याचे मूळ शोधायचे असल्यास ते अवघड होईल. मशिदींवरील भोंग्यांबाबत राज यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना, मागील पाच वर्षे भाजपची सत्ता होेती. त्यावेळी भाजप सरकारने भोंग्यांबाबत का कारवाई केली नाही? केवळ निवडणुका आल्या की, धर्मवादाच्या नावाखाली मतदारांना वळविले जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. कालच्या मेळाव्यात ठाकरे भाजपचाच प्रचार करत होते, असा आरोपही ना. भुजबळ यांनी केला.

…म्हणून लोक जातात : राज ठाकरे चांगले बोलतात म्हणून लोक त्यांच्या सभांना जातात. पण त्यांचे वागणे लोकांना समजत नाही. एवढेच नव्हे, तर पक्षवाढीबाबत कार्यकर्त्यांनाही दिशा समजेनाशी झाली आहे. आपले आमदार व नगरसेवक किती, याचा विचार राज ठाकरे यांनी करावा, असा टोमणाही ना. भुजबळ यांनी लगावला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news