सांगली: आरेवाडीतील बिरोबा देवाची यात्रा बुधवारपासून | पुढारी

सांगली: आरेवाडीतील बिरोबा देवाची यात्रा बुधवारपासून

नागज; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवाची यात्रा तीन वर्षानंतर होत आहे. भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार सुमनताई पाटील व तहसीलदार बी. जी. गोरे यांनी केले.

आरेवाडी येथील श्री बिरोबा देवाची यात्रा दि. 6 एप्रिल ते 8 एप्रिल अखेर होणार आहे. त्यासंदर्भात यात्रा नियोजन बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. तहसीलदार गोरे म्हणाले, यात्राकाळात आरोग्य यंत्रणा व अग्निशमन दल सज्ज ठेवावे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणेने सतर्क राहावे. यात्रेत पिण्याच्या पाण्यासाठी फिरत्या टँकरची व्यवस्था करण्यात यावी. भाविकांच्या खासगी गाड्यांना पोलिसांकडून त्रास होऊ नये यासह अन्य मागण्या यात्रा कमिटीतर्फे करण्यात आल्या. रोहित पाटील यांनी यात्रेत पाणीपुरवठा करण्यासाठी दहा टँकर देेण्याचे आश्वासन दूरध्वनीवरून दिले. काशिलिंग कोळेकर यांनी एक टँकर देणार असल्याचे सांगितले.

Back to top button