नाशिक : गंगापूर रोडवर दोन गटांत हाणामारी | पुढारी

नाशिक : गंगापूर रोडवर दोन गटांत हाणामारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : मैत्रिणीसह उद्यानात बसलेल्या युवकास पिता-पुत्राने मारहाण केल्याची, तर युवकाने त्याच्या मित्रांना बोलवत पिता-पुत्रासह इतर दोघांना मारहाण केल्याची घटना गंगापूर रोडवरील कश्यपी उद्यानासमोर घडली. या प्रकरणी परस्परविरोधी मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिनेश जगदीश रघुवंशी (५३, रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार संशयित करणसिंग विलास पाटील (२७, रा. गंगापूर रोड) हा मंगळवारी (दि. १) रात्री ९.३० च्या सुमारास कश्यपी उद्यानात एका मुलीसोबत बोलत होता. त्यामुळे रघुवंशी यांनी त्यास तेथून जाण्यास सांगितले असता संशयित करणसिंग याने दिनेश यांना मारहाण करीत दमदाटी केली. त्यानंतर त्याने त्याच्या दोन साथीदारांना बोलवून घेत कारमधील रॉडने दिनेश यांच्यासह त्यांचा भाऊ मनीष, मुलगा अनिष व पुतण्या सिद्धांत रघुवंशी यांना मारहाण करीत दुखापत केली.

या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात दिनेश यांच्या फिर्यादीनुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी करणसिंग यास अटक केली आहे. तर करणसिंग याच्या फिर्यादीनुसार तो मैत्रिणीसोबत उद्यानात बसलेला असताना संशयित दिनेश रघुवंशी व मनीष रघुवंशी यांनी कुरापत काढून शिवीगाळ करीत मारहाण केली. तर मनीषने लाकडी दांड्याने मारहाण करीत दुखापत केली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button