रत्नागिरी : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गोठणेत शिकारीच्या उद्देशाने घुसलेल्या ३ संशयितांना वनकोठडी   

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गोठणे
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गोठणे

 रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गोठणे येथील गाभा क्षेत्रात विनापरवाना शस्त्रास्त्रासह शिकारीच्या उद्देशाने घुसलेल्या तिन संशयित आरोपींना रत्नागिरीच्या न्यायदंडाधिकार्‍यांनी ५ दिवसांची वनकोठडी  सुनावली. संदीप तुकाराम पवार (वय ३७, रा.हातीव पुनर्वसन), मंगेश जनार्दन कामतेकर (वय ३३) आणि अक्षय सुनिल कामतेकर (वय १९,दोन्ही रा.मारल) अशी संशयितांची नावे आहेत.

व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेर्‍यात आरोपी कैद

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गोठणे येथे अखिल भारतीय व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेर्‍यात ३१ मार्च रोजी काही आरोपी दिसून आले होते. याबाबत वनरक्षक रामदास दणाने यांनी तात्काळ वनगुन्हा जारी करुन वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलावडे यांनी कराडच्या विभागीय कार्यालयाला कळवून उपसंचालक उत्तम सावंत तसेच विभागीय वन अधिकारी, चांदोली राष्ट्रीय उद्यानचे विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु केला. विभागीय कार्यालयातून सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे तसेच फिरते पथकाचे शिशुपाल पवार यांना चांदोली येथे पाचारण करुन तपास सुरु करण्यात आला.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गोठणे : ५ दिवसांची वनकोठडी

तपास पथकाने प्रथम आंबा घाटातून व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिम दिशेला आसपासच्या गावात चौकशी केली. तसेच खबर्‍याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १ एप्रिल २०२२ रोजी हातीव (गोठणे पुनर्वसित) गावात जाऊन चौकशी केली. हे पथक तिथे पोहचताच त्याठिकाणी संशयास्पद हालचाली दिसून आल्या. कसून चौकशी केल्यावर एक संशयित मिळाला. त्याने शिकारीच्या उद्देशानो व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात प्रवेश केल्याचे मान्य केले. शनिवार २ एप्रिल रोजी अन्य दोन संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मारळ ता.संगमेश्वर येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले. या तिघांनीही वनविभागाच्या हद्दीत श्स्त्रास्त्रासह शिकारीसाठी गेल्याचे कॅमेर्‍यात आल्याचे कबूल केले. त्यांना वन्यजीव कायदा १९७२ अन्वये अटक करण्यात आली. देवरुखचे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी रजेवर असल्याने रत्नागिरीच्या न्यायदंडाधिकार्‍यांसमारे त्यांना हजर करण्यात आले असता ५ दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या मोबाईलमध्ये संशस्यापद छायाचित्रे आढळून आली असून अधिकचे धागेदारे हाती लागण्याची शक्यता आहे.

ही कारवाई सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत तसेच विभागीय अधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या तपास पथकातील सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे, चांदोली वन्यजीव वनक्षेत्रपाली नंदकुमार नलावडे, फिरते पथकातील वनपाल शिशुपाल पवार, गारदी,वनरक्षक दणाने, वाहचालक सचिन, अनंत, सागर तसेच वन्यजीव प्रेमी प्रतिक मोरे यांनी केली. तसेच रत्नागिरी वन विभागाचे विभागीय अधिकारी दिपक खाडे, वनक्षेत्रपाल प्रियंका लगड, देवरुखचे वनपाल मुल्ला, वनरक्षक गावडे आणि त्यांचे अधिनस्त कर्मचारी तसेच पंचक्रोषितले पोलिस पाटील, सरपंच यांचीही मदत लाभली.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news