सांस्कृतिक राजधानी; अगतिक नाशिककर

सांस्कृतिक राजधानी; अगतिक नाशिककर
Published on
Updated on

नाशिक : प्रताप म. जाधव 

आपण नाशिककर आपल्या शहराला मोठ्या अभिमानाने महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतो; पण गेल्या काही दिवसांतील घटना-घडामोडी पाहिल्या तर तेवढ्या आत्मविश्वासाने हे कौतुक आपण मराठीजनांसमोर मिरवू शकू का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, महान नाटककार वसंतराव कानेटकर, आपल्या तळपत्या लेखणीद्वारे कष्टकरी, पीडित समाजाचा आवाज बुलंद करणारे वामनदादा कर्डक-बाबूराव बागूल आदींच्या साहित्याच्या सहवासाने येथे रुजत गेलेली साहित्यिक-सांस्कृतिक चळवळ आणि मुळातच या शहराचा स्थायीभाव असलेला अभिजात सुसंस्कृतपणा यामुळे या शहराची अशी वैशिष्ट्यपूर्ण ओळख बनली हे सर्वविदीत आहे. ही सारीच माणसे इतकी थोर आणि त्यांच्या नावाचा दबदबाच इतका मोठा की त्यांच्याकडून एखादी कल्पना, सूचना येण्याचा उशीर; ती कमालीची यशस्वी होणे हा जणू नियमच बनून गेला होता. अशा रीतीने नाशिकमध्ये अनेक संस्था उभा राहिल्या; सांस्कृतिक मंडळे सुरू झाली. त्यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम, व्याख्याने, चर्चा-परिसंवाद होऊ लागले.

या सगळ्यांचा बौद्धिक आनंद घेणारे नाशिककर आजही त्या कार्यक्रमांच्या अमीट आठवणींमध्ये रमून जात असल्यास नवल नाही. पद वा प्राप्तीचा कोणताही मोह-लोभ नसलेले कार्यकर्ते या संस्था-मंडळांचा कणा होता. त्यांच्यापैकी अनेकजण ना कधी मान्यवरांच्या शेजारी व्यासपीठावर बसले, ना कधी त्यांचे फोटो-बातम्या पेपरात-टीव्हीवर दिसल्या. अर्थात, त्यांनाही त्याची कधी आवश्यकता भासली नाही. उलट, त्यातला फोलपणा अन् ढोंग ठाऊक असल्याने त्यापासून ते दूरच राहिले. त्यातील बहुतांश लोक हळूहळू या चळवळीपासून दूर गेले. आता त्यांना या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यात स्वारस्य राहिलेले नाही. कारण, भलत्याच मंडळींनी अलीकडच्या काळात या संस्था-मंडळांचा ताबा घेतला आहे. या लोकांचे हिकमती स्वभाव, पदासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी पाहता प्रामाणिक-निरीच्छ कार्यकर्त्यांनी त्यांना पुढे चाल दिली आहे.

या बहाद्दरांच्या स्पर्धेत आपण टिकणार नाही, याची त्यांना पूर्ण खात्री आहे. नेतेमंडळींची हुजरेगिरी करणे, लगबगीने त्यांची आवभगत करणे अन् मानभावीपणे मिरवणे या गोष्टींमध्ये आपण त्यांच्या पासंगालाही पुरणार नाही हे पुरते ठाऊक असल्याने त्या भानगडीत पडणेच नको, असे त्यांनी ठरवून टाकले आहे. कोर्टबाजी, पत्रकबाजी, गटबाजी, वार्षिक सभांमध्ये जाऊन तारस्वरात ओरडणे अशा गोष्टींचा सांस्कृतिक चळवळीशी काय संबंध आणि ही कोणती संस्कृती? असा त्यांना पडलेला साधा प्रश्न आहे. त्यामुळे त्या फंदात पडायलाच नको, असा विचार त्यांनी केलेला दिसतो. आता पुढे जाऊन परिस्थिती आणखी बिघडली आणि संस्थेची पायरीही चढणे नको, असा निश्चय त्यांच्यासह अन्य लोकांनी केला तर शहरातील सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू वगैरे असलेल्या त्या संस्थेचे काय होणार, हा खरा आज नाशिककरांना पडलेला प्रश्न आहे.

ही झाली एका वाचनालयाची गोष्ट. आता दुसरी गोष्ट साडेतीन कोटींच्या संमेलनाची. हिशेब द्या, हिशेब द्या असा धोशा लावल्यानंतर कुठे तो मिळाला. पण, तो कुणालाही तपासायला न देताच अचानक समोर ठेवल्याने काही मंडळींना मान्य होईना. संमेलन ज्यांनी एकट्याच्या बळावर ओढून नेले, ते म्हणाले, आता काय करायचं? मग संमेलनाचे आयोजक असलेल्या मंडळाच्या कार्यालयात सर्व कागदं रोेज अमूक अमूक वेळेत सगळ्यांना पाहायला मिळतील, असं जाहीर करण्यात आलं. आता सामान्य नाशिककरांना यात काहीच रस नसल्याने कोण त्या कागदांच्या तपासण्या करत बसणार, हा प्रश्नच आहे.

बरे, ही भांडणं आहेत ती ठरावीक लोकांमधली. संस्था वेगवेगळ्या; पण त्यांच्यावर हुकूमत गाजवण्यासाठी धडपडणारी मंडळी जवळपास तीच. वर्षानुवर्षे तेच चाललंय. काही जण तर 'इथेही मीच आणि तिथेही मीच' अशी मजबूत पकड घेऊन बसलेले. शहाणीसुरती माणसं तिकडे कानाडोळा करत असल्याने चाललंय ते सहन करण्याशिवाय पर्याय नाही. सांस्कृतिक राजधानीतील नाशिककर अगतिक आहेत ते यामुळेच.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : पाणस्थळी हमखास दिसणाऱ्या भोरड्यांच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news