नाशिक : कामाचा धडाका ठरू नये नव्याचे नऊ दिवस! | पुढारी

नाशिक : कामाचा धडाका ठरू नये नव्याचे नऊ दिवस!

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ 

महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासकपदाचे सूत्रे हाती घेताच रमेश पवार यांनी आपली पॉवर दाखविण्यास सुरुवात केली आहे. रुजू झाल्यानंतर लगेचच दुसर्‍या दिवसापासून त्यांनी शहरातील विविध भागांना भेटी देत आपल्या कामाचा धडाका दाखविण्यास सुरुवात केल्याने महापालिकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांसह काम करणार्‍या ठेकेदारांना एक प्रकारे जरब निर्माण झाली आहे. विशेषत: स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकार्‍यांना आणि त्यांच्या ठेकेदारांना जणू काही मोकळे रानच मिळाले होते. आम्ही करू तीच पूर्वदिशा याप्रमाणे कारभार सुरू असल्याने नको ती स्मार्ट कामे, अशी म्हणण्याची नव्हे, तर संबंधित कामे बंद करण्याची वेळ नाशिककरांवर आली होती. परंतु, रमेश पवार यांनी या सर्वांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न सुरू केला असून, त्यामुळे नक्कीच कामांचा दर्जा राखला जाईल आणि कामे वेळीच पूर्णत्वास जातील. परंतु, आयुक्तांचा हाच कामाचा धडाका केवळ नव्याचे नऊ दिवस ठरू नये, हीच नाशिककरांतर्फे अपेक्षा!

शासकीय सेवेत असताना एकाच ठिकाणी जास्त कालावधी झाल्यास लागेबांधे निर्माण होऊन कर्तव्य कठोर होणे कठीण असते. त्यामुळेच शासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना बदलीसारख्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी बदली होणे हे काही शासकीय अधिकार्‍यांना नवे नाही. मनपाचे तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांच्या बदलीची फाइल खरे तर मागील वर्षाअखेरच तयार होती. परंतु, काही लोकप्रतिनिधींनी शिष्टाई करत जाधव यांची बदली लांबविली. परंतु, आता झालेल्या त्यांच्या बदलीला निमित्त ठरले ते म्हाडा सदनिका आणि भूखंड हस्तांतरण प्रकरण. महापालिकेच्या दृष्टीने या प्रकरणात मनपाची काहीच चूक नसल्याचा दावा केला जातो. परंतु, मग माहिती देण्यासाठी झालेला प्रचंड विलंब का आणि कशासाठी याचे कारण मात्र मनपा प्रशासनाकडे नाही.

यामुळे कुठे तरी पाणी मुरतेय म्हणूनच बदलीला जाधव यांना सामोरे जावे लागले हे निश्चित! कैलास जाधव यांच्या जागी बृहन्मुंबईचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी पदभार घेत आणि सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांनी आपल्या कामाचा धडाका नाशिककरांना दाखवून दिला आहे. त्यांच्या कामाचे विशेष म्हणजे पर्यावरण, सुशोभीकरण, उद्याने, प्रदूषणमुक्त गोदावरी या कामांना त्यांनी आधीच प्राधान्य दिले असून, त्यानुसारच त्यांनी आपल्या कामकाजाची सुरुवात केली आहे.

स्मार्ट कंपनीच्या मनमानीला चाप

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नाशिककरांनी स्मार्ट नाशिकचे स्वप्न रंगवले होते. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीतील अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे केंद्र सरकारच्या या चांगल्या व लोकाभिमुख योजनेला डाग लागला गेला आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहरातील जुने नाशिक व पंचवटी गावठाण या भागात सुरू असलेल्या कामांमुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता कामे सुरू असल्याने सर्वच कामांचा गोंधळ उडाला आहे. काम पूर्ण करण्याऐवजी अन्य कामे सुरू करण्यावरच भर दिला जात असल्याने ‘एक ना धड भारंभार चिंध्या’ अशी स्मार्ट कामांची अवस्था झाली आहे.

याच कामांच्या अनुषंगाने दोन दिवस मनपा प्रशासक रमेश पवार यांनी स्मार्ट कामांची पाहणी करत नाराजी तर व्यक्त केलीच; परंतु कामांकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकारी व ठेकेदारांनाही फैलावर घेतले. कान्हेरेवाडीत रस्ता काँक्रिटीकरणाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण न करताच संबंधित ठेकेदाराने दुसर्‍या टप्प्यातील काम सुरू केले. ही बाब निदर्शनास येताच पवार यांनी त्याबद्दल अधिकारी आणि ठेकेदाराला जाब विचारला. मुळात पहिले काम पूर्ण न करताच दुसर्‍या टप्प्याचे काम हाती घेण्याबद्दल सीईओ सुमंत मोरे यांनीच ठेेकेदाराला जाब विचारणे अपेक्षित होते. परंतु, ते काम आयुक्तांना करावे लागले. त्यातच स्मार्ट सिटी कंपनीच्या कामाचा प्रत्यय येतो. यापूर्वीदेखील स्मार्ट सिटी कंपनीने मनपा आणि कंपनीच्या संचालकांना विश्वासात न घेता ‘हम करे सो कायदा’ असाच आपल्या कामाचा होरा ठेवला आहे. परंतु, आयुक्तांमुळे चाप बसेल यात शंकाच नाही.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : पाणस्थळी हमखास दिसणाऱ्या भोरड्यांच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Back to top button