नाशिक : आयुक्तांच्या ‘त्या’ आदेशावर काय म्हणाले पालकमंत्री भुजबळ | पुढारी

नाशिक : आयुक्तांच्या 'त्या' आदेशावर काय म्हणाले पालकमंत्री भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विनाहेल्मेट दुचाकीचालकास पेट्रोल दिल्यास चालकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गृहीत धरून थेट पेट्रोलपंप चालकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिला आहे. त्यावरून संतप्त झालेल्या नाशिक जिल्हा पेट्रोल-डिझेल डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी (दि.31) पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यावेळी ना. भुजबळ यांनी पोलिस आयुक्तांच्या नव्या आदेशावर स्वत:च्याच डोक्याला हात लावून घेत या निर्णयाविरोधात हसून हात जोडले. तर दुसरीकडे पेट्रोलपंपचालक पाडव्याच्या दिवशी पेट्रोलपंप बंद ठेवण्यावर ठाम आहेत.

असोसिएशनचे भूषण भोसले, विजय ठाकरे, सुदर्शन पाटील, नितीन धात्रक यांसह इतर पदाधिकार्‍यांनी ना. भुजबळ यांची भेट घेतली. त्यांनी पोलिस आयुक्तांच्या तोंडी आदेशाबाबत असोसिएशनची भूमिका पालकमंत्र्यांसमोर मांडली. त्यावेळी ना. भुजबळ यांनीही हा आदेश ऐकून डोक्यास हात मारून घेत कुत्सित हास्य करीत हात जोडले. असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, 15 ऑगस्ट 2021 पासून शहरात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही मोहीम सुरू झाली. सुरुवातीला पोलिसांनी बंदोबस्त दिला. मात्र, बंदोबस्त हटवल्यानंतर पंपावरील कर्मचार्‍यांना नाशिककरांची दमदाटी सुरू झाली. अनेक ठिकाणी वाद झाल्याने विनाहेल्मेट नाइलाजास्तव पेट्रोल द्यावे लागले. त्यावरून पोलिस आयुक्तांनी पेट्रोलपंपचालकांना ‘तुमचा पंप बंद का करू नये’, या नोटिसा पाठविल्या.

पेट्रोलपंपचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या संदर्भात आयुक्तांकडे सुनावणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र, 19 नोव्हेंबर 2021 पासून आतापर्यंत त्यावर सुनावणी झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत सुनावणी होत नाही, तोपर्यंत पोलिसांच्या मोहिमेस सहकार्य न करण्याची भूमिका असोसिएशनने पालकमंत्र्यांसमोर स्पष्ट केली आहे.

गुढीपाडव्याला पेट्रोलपंप राहणार बंद…
पोलिस आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध शनिवारी (दि. 2) शहरातील इंधन विक्री नाइलाजास्तव बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. 1) मध्यरात्री ते शनिवारी मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही नागरिकाला इंधन दिले जाणार नाही. अत्यावश्यक सेवेतील वाहनांनी केवळ पोलिसांच्या पेट्रोलपंपावरून इंधन खरेदी करावे, असे आवाहन असोसिएशनने केले आहे. तर सणाच्या दिवशी व्यवसाय बंद ठेवू नका, असे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांना केले. मात्र, पदाधिकारी संपावर ठाम आहेत.

हेही वाचा :

Back to top button