सांगली : शिराळ्यात राष्ट्रवादीचा उद्या मेळावा | पुढारी

सांगली : शिराळ्यात राष्ट्रवादीचा उद्या मेळावा

शिराळा :  पुढारी वृत्त सेवा
राष्ट्रवादीतर्फे शनिवारी शिराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. आमदार नाईक म्हणाले, यावेळी वारणा डावा प्रकल्पासाठी 300 कोटी, वाकुर्डे बु. योजनेस 300 कोटी व वारणा धरण गळती प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी 54 कोटी रुपये, अशी एकूण 654 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात जलसंपदा विभागामार्फत केल्याबद्दल जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांचा नागरी सत्कार होणार आहे.

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक कार्यकर्त्यांसमवेत भाजपातून राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. यानिमित्ताने शेतकरी मेळावा होणार आहे. अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील आहेत. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अरुण लाड, आमदार सुमन पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, फतेसिंगराव नाईक सह. दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक उपस्थित राहणार आहेत. शिराळा येथील शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर सकाळी साडेनऊ वाजता मेळावा सुरू होईल.

नाईक म्हणाले, भाजपामधून ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादीत त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत प्रवेश करत आहेत. त्यामुळे मतदारसंघात पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आदी निवडणुकांमध्ये याचा फायदा होणार आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा जिल्ह्यात पक्षाला होईल. मेळाव्यास मतदार संघातील शेतकरी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे.

Back to top button