नाशिक : सिडको प्रशासनाने कामकाजात सुधारणा करावी अन्यथा..,आ.हिरे यांचा इशारा | पुढारी

नाशिक : सिडको प्रशासनाने कामकाजात सुधारणा करावी अन्यथा..,आ.हिरे यांचा इशारा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
सिडकोतील नागरिकांच्या समस्या, तक्रारी सिडको प्रशासन कार्यालयाने त्वरित सोडवाव्यात. जर सिडको प्रशासन कार्यालयाने कामकाजात सुधारणा केली नाही, तर महाराष्ट्राचे गृहनिर्माणमंर्त्यांकडे तक्रार करण्याचा इशारा आ. सीमा हिरे यांनी दिला.

सिडकोतील नागरिकांचे घरांचे हस्तांतरण अथवा कर्जासाठी लागणारी कागदपत्रे यासह इतर नागरिकांची प्रकरणे प्रलंबित असल्याने तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या लहान-मोठ्या कामांना लागणारा विलंब, सिडको कार्यालयातील कर्मचार्‍यांची मुजोरीबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत आ. सीमा हिरे यांनी सिडको कार्यालयास भेट दिली.

यावेळी आ. हिरे यांनी सिडको प्रशासक कांचन बोधले यांच्याशी चर्चा करून नागरिकांची कामे कमीत कमी वेळेत पूर्ण करून देणे, तसेच सिडकोच्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडून नागरिकांना दिल्या जाणार्‍या वागणुकीबाबत सूचना केल्या. यावेळी प्रशासक बोधले यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, एक महिन्यात कामकाजात सुधारणा न झाल्यास महाराष्ट्राचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे तक्रार करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे आ. हिरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सिडको कार्यालयात आलेल्या नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.

यावेळी नगरसेवक मुकेश शहाणे, नगरसेविका प्रतिभा पवार, छाया देवांग, प्रकाश चकोर, शिवाजी बरके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. नागरिकांचे प्रलंबित प्रकरणे लवकर निघावीत यासाठी सिडको प्रशासन कार्यालय नागरिकांना मार्गदर्शन करणार असल्याचे प्रशासक बोधले यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button