रत्नागिरी: एसटीचे 51 कर्मचारी कामावर हजर | पुढारी

रत्नागिरी: एसटीचे 51 कर्मचारी कामावर हजर

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा: शासनाने येत्या दोन दिवसात हजर होण्याच्या सूचना केल्यानंतर एसटी कर्मचारी हळूहळू संपातून मागे घेत असून बुधवारी तब्बल 51 कर्मचारी हजर झाले यामध्ये 21 कर्मचारी नियमित तर 33 कर्मचारी सेवासमाप्तीचे हजर झाले आहेत. या सर्वांची मेडिकल झाल्यानंतरच कामावर हजर करुन घेण्यात आले. येत्या दोन तीन दिवसात 50 टक्के एसटीचे वेळापत्रक सुरु होईल, असा विश्वास रत्नागिरी एसटी विभागाने व्यक्त केला आहे.

शासनाने आवाहन केल्यानंतर कितपत एसटी कर्मचारी सहकार्य करतील अशी साशंकता वाटत असताना बुधवारी जवळपास 51 कर्मचार्‍यांनी मेडिकल करुन हजेरी लावली. एसटी विलीनीकरण होणे शक्य नसल्याचे शासनाने स्पष्ट केले असून विलीनीकरण सोडून बाकी पगार वाढ चांगली करण्यात येईल त्यासाठी आधी हजर व्हावे, असे शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार आता टप्याटप्याने मेडिकल ज्या पध्दतीने होईल त्यापध्दतीने पार पडेल तसे कर्मचारी हजर होणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.

गुरुवारी यापेक्षा अधिक कर्मचारी हजर होणार असल्याचेही रत्नागिरी विभागाने सांगितले. हजर होण्याबाबत येथील विभागीय कार्यालयाबाहेर संपाला पाठिंबा देणार्‍या कर्मचार्‍यांची बैठक पार पडली. जवळपास 50 टक्के कर्मचार्‍यांनी संपातून माघार घेण्यासाठी सकारात्मता दर्शवली आहे. त्यामुळे येत्या सोमवारी 50 टक्के एसटी वेळापत्रक जिल्ह्यात सुरु होईल, असे अधिकारी ठामपणे सांगत आहेत.

गेले चार महिने एसटी बंद असल्याने हजारो विद्यार्थी व कामगार वर्गांचे हाल सुरु होते, ऐन परीक्षेच्या कालावधीत बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांची मोठी ओढाताण होत आहे. सोमवारी नेमके एसटी वेळापत्रक किती टक्के सुरु होईल हे त्याच दिवशी कळणार आहे. हजर होण्यासाठी मेडिकल अत्यावश्यक असल्याने यामध्ये कर्मचार्‍यांचा वेळ लागत आहे.

Back to top button