नाशिक : तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पेट्रोल पंपचालकांवर दाखल होणार गुन्हा | पुढारी

नाशिक : तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पेट्रोल पंपचालकांवर दाखल होणार गुन्हा

नाशिक : शहरात दुचाकीस्वारांसाठी शनिवारपासून (दि.२) पुन्हा हेल्मेट सक्ती होणार असून विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. तर विना हेल्मेट दुचाकीचालकास पेट्रोल देणाऱ्या पेट्रोल पंपचालकावर दुचाकीस्वारास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त दीपक पाण्डे्य यांनी दिला. त्याचप्रमाणे दुसऱ्यांदा पेट्रोल देताना आढळल्यास पेट्रोल पंपाचा परवाना रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात येणार असल्याचे पाण्डे्य यांनी सांगितले.

अपघाती मृत्यू टाळण्यासाठी शहरात हेल्मेट सक्ती सुरु आहे. वेगवेगळे उपक्रम राबवून दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती केली आहे. त्यात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांचे दोन तास समुपदेशन व परिक्षा घेतली जाते. त्याचप्रमाणे दंडात्मक कारवाई होत आहे. शासकीय-निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये येणाऱ्या दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसल्यास परवानगी नाकारण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले हाेते. तर विनाहेल्मेट पेट्रोल भरण्यास आलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याचेही आदेश आहेत. सुरुवातीस या आदेशांचे पालन झाले. मात्र कालांतराने पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने या आदेशाचा सर्वांनाच विसर पडल्याचे चित्र हाेते. दरम्यान, आता शनिवारपासून (दि.२) नव्याने हेल्मेट सक्तीबाबत कारवाईचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शहरात दुचाकीचालक व पाठीमागे बसलेल्या व्यक्तीसही हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे. हेल्मेट नसल्यास दोघांवरही कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल पंपचालकांवरही गुन्हे दाखल होणार आहेत.

हेल्मेट नसलेल्यांवर समुपदेशनासोबतच दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. दुचाकीस्वार दोघांनाही हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. विनाहेल्मेट चालकास पेट्रोल देतील त्या पेट्रोलपंप चालक-मालकांवर दुचाकीस्वारास आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे गृहीत धरुन गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच एकपेक्षा जास्त वेळा अशी चुक झाल्यास संबंधित पेट्रोलपंप धोकादायक झाला असून पेट्रोलपंप का बंद करण्यात येऊ नये अशी नोटीस बजावण्यात येणार आहे.

दीपक पाण्डे्य, पोलिस आयुक्त

हेही वाचा :

Back to top button