नाशिक : स्वागतयात्रा समिती पदाधिकारी आयुक्तांना न भेटण्यावर ठाम | पुढारी

नाशिक : स्वागतयात्रा समिती पदाधिकारी आयुक्तांना न भेटण्यावर ठाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या पदाधिकार्‍यांनी पोलिस आयुक्तांकडे परवानगी मागितली. मात्र, त्यावरून वाद निर्माण झाले आहेत. तासन्तास कार्यालयाबाहेर बसवून ठेवत भेट नाकारल्याचा आरोप समितीच्या पदाधिकार्‍यांनी केला होता.

तर दिलेल्या वेळेत पदाधिकारी भेटण्यास येत नसल्याचा दावा पोलिस आयुक्तांनी केला. परवानगी देण्यासाठी प्रत्यक्ष भेटून काही प्रश्नांची उत्तरे घेतल्यानंतरच परवानगी देण्याचा पवित्रा पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी घेतला आहे. तर आता भेटण्याचा प्रश्न नसून परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे दिली आहेत. त्यावरून परवानगी द्यावी, असा पवित्रा नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या पदाधिकार्‍यांनी घेतला आहे.

सोमवारी (दि.28) पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना नववर्ष स्वागतयात्रा समितीचे पदाधिकारी जयंत गायधनी यांनी सांगितले की, आयपीएस अधिकार्‍याने उद्विग्न होत पत्रकार परिषद घेणे, अत्यंत दुर्दैवी आहे. पोलिस आयुक्तांची बदली व्हावी, ही आमची इच्छा अथवा उद्देश नाही. त्यांची बदली झालीच तर, त्यांच्या कर्तृत्वाने होईल. तर आम्ही विनंतीच्या सुरात परवानगी मागितली. मात्र, पोलिसांकडून सातत्याने उद्या या, परवा या असे सांगत अधिकार्‍यांनी टाळाटाळ का केली, याबाबत आयुक्तांनी चौकशी करायला हवी. लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांनाही यश येत नसेल. तर, सर्वसामान्य माणसांनी काय करावे. आम्ही पोलिस आयुक्तांना भेटणार नाही. कागदपत्रे दिली आहेत, असा दावा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी केला.

हेही वाचा :

Back to top button