सातारा: आ.शिवेंद्रराजेंच्या वाढदिनी महारूद्र पंचायतन महायज्ञ | पुढारी

सातारा: आ.शिवेंद्रराजेंच्या वाढदिनी महारूद्र पंचायतन महायज्ञ

सातारा; पुढारी वृत्तसेवा: सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिनी बुधवारी (दि. 30) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सातार्‍यातील गांधी मैदान येथे भव्य-दिव्य महारूद्र पंचायतन महायज्ञ सोहळा होणार आहे. या महायज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा बुधवारी वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त महायज्ञासह विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी 8 ते 2 या वेळेत महारूद्र पंचायतन महायज्ञ होणार आहे. नैसर्गिक प्रकोप दूर होण्याबरोबरच सर्व प्रकारच्या रोगांचे निवारण व्हावे व जनकल्याणासाठी हा महायज्ञ सोहळा होणार आहे. येथील वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली

हा सोहळा होणार आहे. या महायज्ञास सर्वांनी उपस्थित रहावे तसेच प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
महायज्ञानंतर दुपारी 4.30 वाजता यवतेश्वर येथे स्व. अभयसिंहराजे भोसले कमानीचे उद्घाटन, सायंकाळी 5 वाजता शिवतीर्थावर हेलिकॉप्टरने पृष्पवृष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महाभिषेक करण्यात येणार आहे.

मंगळवार पेठेतील आनंदाश्रम, लक्ष्मीबाई पाटील वसतिगृह सोमवार पेठ, रिमांडहोम सदरबझार, आशा भवन कोडोली, मातोश्री वृद्धाश्रम खावली, एहसास मतिमंद शाळा वळसे, भिक्षेकरी गृह जरंडेश्वर नाका, जिल्हा रुग्णालय सातारा (रुग्ण नातेवाईक), आर्यांग्ल हॉस्पिटल (रुग्णांना), शाहू बोर्डिंग धननीची बाग, मदरसा कब्रस्थान आणि मदरसा मोळाचा ओढा, आनंद परिवार मतिमंद शाळा फुटका तलाव याठिकाणी आ. शिवेंद्रराजे यांच्यातर्फे मिष्टान्न भोजन वाटप करण्यात येणार आहे.

सायंकाळी 5.30 वाजता कोटेश्वर मैदानाजवळील कला व वाणिज्य कॉलेजच्या मैदानावर आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन आ. शिवेंद्रराजे यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी वाजता 6.30 वाजता कला व वाणिज्य कॉलेजच्या मैदानावर आ. शिवेंद्रराजे शुभेच्छा स्वीकारणार आहेत. यावेळी सातारा-जावली मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आ. शिवेंद्रराजेप्रेमी उपस्थित राहणार आहेत.

Back to top button