सेनेकडून भाजपला केवळ युतीचे गाजर, पण भाजपने रणनीती बदलली ! संघर्ष टिपेला पोहोचणार | पुढारी

सेनेकडून भाजपला केवळ युतीचे गाजर, पण भाजपने रणनीती बदलली ! संघर्ष टिपेला पोहोचणार

मुंबई; नरेश कदम : शिवसेनेचे नेते केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर येऊ लागताच शिवसेनेकडून भाजपकडे युतीचे प्रस्ताव मध्यस्थांमार्फत जाऊ लागले. प्रत्यक्षात बोलणी मात्र झाली नाही. कारवाया टाळण्यासाठी शिवसेना युतीचे केवळ गाजर दाखवत असल्याचे भाजपच्या लक्षात येताच शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष टोकाला गेल्याचे आता स्पष्ट होत आहे.

उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने आता आपली रणनीती बदलली असून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांच्या चौकशीचे पाऊल केंद्रीय यंत्रणांनी उचलले आहे. परिणामी शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष टिपेला पोचणार आहे. 2019 मध्ये शिवसेनेने थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आघाडी सरकार बनविले, तेव्हा शिवसेना जास्त काळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी सरकारमध्ये राहणार नाही, अशी अटकळ भाजपने बांधली होती.

आघाडीअंतर्गत लाथाळ्यातून हे सरकार पडेल, असेही भाजपच्या नेतृत्वाला वाटत होते. परंतु, ठाकरे सरकारने एक वर्ष पूर्ण केले आणि केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर शिवसेनेचे नेते येऊ लागले. नेत्यांच्या चौकशीचे सत्र वाढताच शिवसेनेमध्ये अस्वस्थता वाढली. त्यातून अनेकवेळा मध्यस्थांमर्फत शिवसेनेकडून पुन्हा युती करण्याचे प्रस्ताव भाजपच्या नेत्यांकडे पाठवले गेले. पण शिवसेना फक्‍त प्रस्ताव पाठवत राहिली. प्रत्यक्षात दोन्ही पक्षांच्या नेत्यांत यावर चर्चा झाली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

केंद्रीय यंत्रणांकडून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या घरांवर आणि मालमत्तांवर धाडी पडल्या. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे मंत्री गजाआड गेले. शिवसेनेच्या नेत्यांवर धाडी पडल्या असल्या तरी सेनेचा एकही नेता अद्याप गजाआड गेलेला नाही. 25 वर्षांपासूनचा मित्र म्हणून युती करण्यासाठी भाजपचे प्राधान्य शिवसेनेलाच असल्याने केवळ चौकशा लावून भाजपने शिवसेनेवरचा दबाव वाढवला. एक पाऊल मागे घेण्यासाठी जागाही ठेवली.

टोकाचे आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत, असे मध्यंतरी या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये ठरले होते. पण चाणाक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत मतभेदाची दरी वाढविण्याचे काम केले, असे शिवसेनेच्या एका नेत्याने खासगीत सांगितले.

शिवसेनेची द्विधा स्थिती

उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात शिवसेनेने हाती घेतलेल्या शिवसंपर्क अभियानात शिवसेनेतील अंतर्गत धुसफूसदेखील बाहेर पडू लागली आहे. भाजपसोबत युती करण्यासाठी सेनेतील आमदारांचा मोठा गट उत्सुक असल्याचे लपून राहिलेले नाही.शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर आणि आमदार तानाजी सावंत यांनी तर हे शिवसेनेचे नाही तर पवार सरकार आहे, अशी खदखद व्यक्त केली. युतीत शिवसेना सडली अशी जहाल भाषा वापरल्यानंतरही 2019 मध्ये भाजपसोबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या नेतृत्वाने युती केली होती. त्यामुळे पक्ष वाचविण्यासाठी शिवसेनेने आताही एक पाऊल मागे यावे, असे शिवसेनेच्या आमदारांचे मत आहे. मात्र, मातोश्रीचे निकटवर्तीय नेते 2024 मध्ये केंद्रात सत्तांतर होईल या आशेवर आहेत. त्यातून शिवसेनेचे नेतृत्व द्विधा मनस्थितीत अडकले, असे सेनेतील एका गटाचे म्हणणे आहे.

दोन्ही काँग्रेससाठी गळ

शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसमधील एक गट फोडता येईल काय, याची तयारी भाजपच्या धुरिणांनी सुरू आहे. गळ टाकलेले आहेत. 2024 मध्ये काँग्रेसची देशात सत्ता येण्याची शक्यता धूसर आहे, अशी भीती काँग्रेसच्या आमदारांना आहे. त्यामुळे त्यांना या मिशनमध्ये ओढले जाऊ शकते.

भाजपचे ‘मिशन महाराष्ट्र’

दुसरीकडे चौकशा टाळण्यासाठी केवळ युतीचे प्रस्ताव पाठवून झुलवत ठेवणार्‍या शिवसेनेविरोधात आरपारची लढाई करण्याचे आता भाजपने ठरवले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करण्याची रणनीती भाजपने आता आखली असून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. त्यासोबतच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केली.

या कारवाईनंतरही शिवसेनेने भाजपकडे युतीची चाचपणी केली. मात्र आता शिवसेनेच्या युतीच्या गाजराला भुलायचे नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. चार राज्यातील विजयानंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व आता मिशन महाराष्ट्रची तयारी करत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याच्या मालमत्तांची सुरू झालेली चौकशी हा त्याचाच एक भाग मानला जातो.

हे ही वाचलं का ?

Back to top button