नाशिक : बाजार समित्या बंद राहणार असल्याने कांदा उत्पादक चिंतेत | पुढारी

नाशिक : बाजार समित्या बंद राहणार असल्याने कांदा उत्पादक चिंतेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; आधीच कांद्याचे दर कोसळलेले असताना मार्चअखेरचे कारण देऊन जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील लिलाव प्रक्रिया दोन ते तीन दिवस बंद राहणार आहेत. यामुळे एप्रिलमध्ये बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याचे दर आणखी कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे मार्चअखेरचे कारण देऊन बाजार समित्यांमधील लिलाव बंद ठेवू नयेत, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

मार्चअखेरीस हिशेब पूर्ण करण्यासाठी बाजार समित्यांमधील कांदा व्यापार्‍यांनी जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील लिलाव प्रक्रिया बंद ठेवली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत. कांद्याचे दर या महिन्यात मोठ्या प्रमाणावर कोसळले असून, शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यात जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद राहिल्यामुळे एप्रिलमध्ये लिलाव सुरू होताच, कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होऊन कांदा अक्षरश: कवडीमोल दराने विकला जाण्याची शक्यता आहे. यामुळे व्यापार्‍यांनी हिशेब पूर्ण करण्यासाठी लिलाव बंदचा निर्णय मागे घेऊन इतर पर्यायांचा शोध घेण्याची मागणी होत आहे. यापूर्वी सहकार आयुक्तांनी बाजार समित्यांना पत्र देऊन बाजार समितीमधील लिलाव दोन दिवसांपेक्षा अधिक दिवस बंद ठेवू नयेत, असे निर्देश दिले आहेत.

असे असतानाही नाशिक जिल्ह्यातील लिलाव तीन ते चार दिवस बंद राहणार असल्यामुळे शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त होत असून, सरकारच्या नियमांना बाजार समित्या व व्यापारी जुमानत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

बाजार समित्या लिलाव बंद
लासलगाव ः 30 मार्च 1 एप्रिल
कळवण ः 28 मार्च ते 4 एप्रिल
पिंपळगाव (ब.) ः 26 मार्च 1 एप्रिल
येवला ः 26 मार्च ते 2 एप्रिल
नामपूर ः 28 मार्च ते 3 एप्रिल
मनमाड ः 29 मार्च ते 3 एप्रिल
सटाणा ः 28 मार्च ते 1

हेही वाचा :

Back to top button