नाशिक : पिंपळगाव बाजार समिती परिसरात सीसीटीव्हीचा वॉच : सर्वसाधारण सभेत निर्णय | पुढारी

नाशिक : पिंपळगाव बाजार समिती परिसरात सीसीटीव्हीचा वॉच : सर्वसाधारण सभेत निर्णय

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा
पिंपळगाव बाजार समितीने गेल्या 22 वर्षांपासून शहराच्या वैभवात भर घालण्याचे काम केले आहे. आत्तापर्यंत जे काही काम केले ते व्यक्तिगत हितासाठी नाही, तर शेतकरी हितासाठीच केले असून, बाजार समितीत शेतकर्‍यांशी मनमानी करणार्‍या आठ आडतदार-व्यापार्‍यांचे परवाने रद्द करण्यात येत असल्याचा तसेच बाजार आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय सभापती तथा आमदार दिलीप बनकर यांनी जाहीर केला. बाजार समितीच्या 17 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

बाजार समितीची सभा सभापती बनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी उपसभापती दीपक बोरस्ते, जि. प. सदस्य सिद्धार्थ वनारसे, सुरेश कमानकर, संचालक सुरेश खोडे, सोहनलाल भंडारी, रामभाऊ माळोदे, नंदू सांगळे, संजय मोरे, निवृत्ती धनवटे, शंकरलाल ठक्कर, सुनीता राजोळे, अतुल शहा, दीपक बनकर, विजय बाफना, बाबासाहेब शिंदे, माधव ढोमसे, शरद काळे, संपत विधाते, सोपान खालकर, नारायण पोटे, सचिव बाळासाहेब बाजारे आदींसह शेतकरी व्यापारी, कामगार घटक उपस्थित होते.

आ. बनकर म्हणाले, कोरोनासारखी महामारी असताना बाजार समितीने शेतकरी, कामगार घटकांसाठी सोयी-सुविधा पुरवल्या, शिवाय मदतनिधींनी उपलब्ध करून दिला. तसेच येथे येणार्‍या शेतकरी, कामगारांसाठी अवघ्या 10 रुपयांत किसान थाळी सुरू केली. असा उपक्रम राबविणारी पिंपळगाव बाजार समिती पहिली बाजार समिती असल्याचे ते म्हणाले. सचिव बाळासाहेब बाजारे यांनी 20-21 अहवालाचे वाचन केले. यात उत्पन्न 20 कोटी 67 लाख, 23 हजार झाले. तर खर्च 10 कोटी 70 लाख 49 हजार यातून वजा जाता जवळपास 9 कोटी 96 लाख 74 हजारांचा वाढीव मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. सुरेश खोडे, सोहनलाल भंडारी यांनी कामकाजाचा आढावा घेतला. पतसंस्थेने रानवड कारखाना सुरू केला आहे. बाजार समितीच्या माध्यमातून निसाका सुरू होण्याची अपेक्षा नंदू सांगळे यांनी व्यक्त केली. नारायण पोटे यांनी आभार मानले.

हेही वाचा :

Back to top button