बाळूमामा भाकणूक : तिसरे महायुद्ध होईल...! कोरिया, चीन जगाला घातक ठरतील, बैलाची किंमत बकऱ्याला येईल | पुढारी

बाळूमामा भाकणूक : तिसरे महायुद्ध होईल...! कोरिया, चीन जगाला घातक ठरतील, बैलाची किंमत बकऱ्याला येईल

मुदाळतिट्टा; शाम पाटील : रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे महाभयंकर परिणाम जगाला भोगावे लागतील. कोरिया, चीन ही राष्ट्रे जगासाठी घातक ठरतील. जगातील अनेक राष्ट्र एकमेकांशी लढतील. एकमेकांचे भाग काबीज करतील. कठीण प्रसंग निर्माण झाल्यामुळे जगात तिसरे महायुद्ध होईल. भारतावर तीन राष्ट्रे आक्रमण करतील. भारत -पाकिस्तान युद्ध सुरूच राहील. भारतीय सैनिक भारत मातेचे रक्षण करतील. परकीयांचे हल्ले परतवून लावतील. अशी बाळूमामा भाकणूक कृष्णा बाबुराव ढोणे पुजारी वाघापूरकर यांनी केली.

श्री क्षेत्र आदमापुर (ता. भुदरगड) येथील बाळूमामा भंडारा यात्रा प्रसंगी भाकणूक कार्यक्रमात भविष्यवाणी केली. मराठी वर्षातील ही शेवटची भाकणूक असल्यामुळे आगामी वर्षात काय होणार याचा सूचक इशारा या ठिकाणी मिळत असल्याने साऱ्याचे लक्ष या भाकणुकीकडे लागून राहते. बाळूमामा देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत लाखो भाविकांच्या समोर ही भाकणूक मंगळवार (दि. २९) मार्च रोजी पहाटे चार वाजता संपन्न झाली. या सोहळ्यास सुमारे १ लाखांहून अधिक भाविक आल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.

बाळूमामा कृष्णात डोणे यांनी केलेली भाकणूक अशी…

अठरा तर्हेचा एक आजार होईल. कालवा कालव होईल. जगावर आजारांची संकट येतच राहतील. आजारावर औषध मिळणार नाहीत. डाॅक्टर लोक हात टेकतील. जगावर आलेलं कोरोनाचं संकट कमी जास्त होईल. कोरोना पेक्षा मोठी महामारी येईल. कलियुगात मनुष्याला अल्प आयुष्य लाभले. हा सगळा मायेचा बाजार हाय. निती धर्माला अनुसरुन वागा. सुखात ठेवीन.

भारत- पाकिस्तान संघर्ष सुरु राहील, दोघांत छुपे युद्ध होईल. अतिरेकी घुसखोरी करतील. मोठे बॉम्ब स्फोट करतील. घोटाळा होईल. मोठी शहरे उध्वस्त होतील. माणूस माणसाला खाईल. कापाकापी होईल. दिवसाढवळ्या दरोडेखोराकडून लुटमार होईल.

 

देशाच्या, राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ

देशाच्या, राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांट उड्या मारतील. राजकारणी मंडळी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. काँग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण राहील. कमळ पक्षाचा झेंडा मिरवेल. राजकारणात महिलावर्ग बाजी मारेल. राजकारणात लोक देवा धर्माला विसरुन जातील. पैसा न खाणारा सापडणार नाही. भ्रष्टाचार उंदड होईल. नेतेमंडळी तुरुंगात जातील. राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल.

साखरेचा भाव तेजी मंदीत राहील. गुळाचा भाव उच्चांकी राहील. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील. उसाच्या कांड्यांचा दुधाच्या भांड्यानं राज्या-राज्यात गोंधळ निर्माण होईल. शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होईल. सीमा भागातले राजकारण ढवळून जाईल. निपाणी भागात मोठा गोंधळ होईल. सीमा प्रश्न राजकीय लोकांच्या फक्त चर्चेत राहील.

दीड महिन्यात धान्य उदंड पिकेल. खरीप पिक चांगले होईल. गोर गरीबाला पुरावा करील‌. तांबडी रास मध्यम पिकेल. पांढर धान्य उदंड पिकलं. गव्हाची शेती मध्यम पिकेल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. वैरण सोन्याची होईल सांभाळून ठेवा.

बैलाची किंमत बकऱ्याला येईल

वैरण – धान्याच्या मोठ्या प्रमाणात चोरी होतील. सरकी फुकाची होईल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. बकऱ्याचा भाव लाखांवर जाईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. कोंबड मनुष्याच्या पाठीशी लागेल. धनगराच बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारेल.

शेतीचा भाव गगनाला भिडेल. शेतीसाठी खून पडतील. पैशाच्या जोरावर न्याय मिळेल. कागदाचा घोडा माणसाला खुळे लावेल. वाड्या वस्त्या ओसाड पडतील. जंगलातील पक्षी गावात येईल. मनुष्य जंगलात जाईल. समुद्राची संपती नाश पावेल. दागिने पैसा मनुष्याला घातक ठरतील. उन्हाळ्याचा पावसाळा होईल. ऋतुमान बदलत जाईल. खडकाच्या लाह्या उडतील.

मी मी, तु तु करु नका. घरातून गेलेला मनुष्य परत घरी येईल सांगता येत नाही. ठेचला मरण हाय. मनुष्याच जगंन धर्माचे, मरण हुकमाचे ठरेल. कलियुगात मनुष्याला कमी आयुष्य लाभले.

गुंडांचे राज्य येईल

गुंडांचे राज्य येईल. लाचलुचपत भ्रष्टाचारास ऊत येईल. नोकरवर्ग समाज खाईल .महागाईचा भस्मासूर वाढेल. सामान्य माणसाला जगणे मुश्कील होईल. कोल्हापुरचे घराणे क्षत्रिय वंशाचे आहे. कोल्हापुरच्या गादीवर फुले पडतील. गादी नावारूपाला येईल. सातार्‍याच्या गादीवर फुले पडतील. सातार्‍याच्या गादीवर फुलं पडतील.

शिवरायांचा जयजयकार ऐकाल. शिवाजी महाराज जन्माला येतील. भगवा झेंडा राज्य करेल. जगात मानानं मिरवेल. जगाच्या कल्याणासाठी बाळू धनगरांना आदमापूरमध्ये अवतार घेतलाय. शेषनागाच्या रूपात तो प्रत्यक्षात आहे. माझ्या शबीना सोहळ्याला तेहतीस कोटी देव हजेरी लावतील.

माझ्या सोहळ्यात फूट पाडशील तर यमपूरी दाखवीन. आदमापूर गावाला माझा आशीर्वाद आहे. बाळू धनगराचा राजवाडा पाहायला दुनियेतील लोक येतील. पिवळ्या भस्माचा आघात मोठा वाढत जाईल. आदमापूर प्रतिपंढरपूर होईल.

Back to top button