पणजी : आजपासून अधिवेशन, उद्या अर्थसंकल्प | पुढारी

पणजी : आजपासून अधिवेशन, उद्या अर्थसंकल्प

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आठव्या विधानसभेचे पहिले अधिवेशन आज, मंगळवार (दि.29) पासून पर्वरी येथील विधानसभा संकुलात सकाळी साडेअकरा वाजल्यापासून सुरू होईल. या वर्षातील हे पहिले अधिवेशन असल्याने पहिल्या दिवशी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे विधानसभेला संबोधित करणार आहेत. सभापतिपदासाठी आज मतदान होणार आहे. सत्तारुढ भाजप आघाडीकडून काणकोणचे आमदार रमेश तवडकर तर विरोधी पक्षांकडून नुव्याचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तवडकर यांना सत्तारुढ गटातील आमदार संख्येपेक्षा दोन- तीन मते जास्त मिळतील, असे वक्तव्य केल्याने आज विरोधकांची एकी अभेद्य राहील काय, याविषयी उत्सुकता आहे.

विधानसभेचे आज व उद्या होणारे अधिवेशन प्रश्नोत्तराच्या तासांविनाच होणार आहे. राज्य सरकारचा 2022-23 चा अर्थसंकल्प बुधवार (दि. 30) रोजी सादर केला जाईल. हे अधिवेशन दोनच दिवसांचे असल्याने अर्थसंकल्पावर चर्चा व मंजुरी जुलैमध्ये बोलावण्यात येणार्‍या पावसाळी अधिवेशनात होणार आहे. पाच महिन्यांसाठी सरकार लेखानुदान घेणार आहे. प्रश्नोतराचा तास, लक्षवेधी सूचना, शून्य तास, खासगी ठराव, अर्ध्या तासाची चर्चा, हरकतीचा मुद्दा आदी विधीमंडळ आयुधे या अधिवेशनकाळात आमदार वापरू शकणार नाहीत.
त्यासाठी जुलैच्या अधिवेशनाची प्रतिक्षा आमदारांना करावी लागणार आहे.

विधीमंडळ सचिव नम्रता उल्मन यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधिमंडळ कामकाज नियम 306 नुसार कामकाज नियम शिथिल केला जाणार आहे. त्यासाठी या विधानसभा अधिवेशनात केवळ सरकारी कामकाज केले जाईल अन्य कोणतेही कामकाज केले जाणार नाही असा ठराव मंजूर करावा लागणार आहे. तो सत्ताधारी गट मांडणार आहे. दि.29 रोजी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहू शकणार्‍या आमदारांच्या नावाची निश्चिती केली जाणार आहे.

अभिनंदनपर प्रस्ताव व शोक प्रस्ताव विधानसभेत सादर केला जाईल. राज्यपालांनी मान्यता दिलेल्या विधेयकांबाबत विधानसभेला विधीमंडळ सचिव माहिती देणार आहेत. दि. 30 रोजी पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत. त्यासंदर्भातील वित्त विनियोग विधेयकही सादर केले जाणार आहेत. यानंतर वित्तमंत्री 2022-23 आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर लेखानुदान मागणी करणारा ठराव मांडला जाईल तसेच संबंधित वित्त विनियोग विधेयक मांडले जाणार आहे. विधानसभेत दुसर्‍या दिवशी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे.

विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्राथमिक तयारी केली आहे. विविध खात्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांना कोणत्या कामासाठी किती निधीची गरज भासणार आहे याचा अंदाज वित्त खात्याकडून घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पाचा ढोबळ आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला आज अंतिम रुप देत अर्थसंकल्पाचे दस्तावेज छपाईसाठी सरकारी मुद्रणालयात पाठवले जाणार आहेत. अर्थसंकल्प छापून तो विधानसभेत मांडेपर्यंत या मुद्रणालयाचे कर्मचारी घरी जाणार नाहीत.
असा असेल ज्येष्ठताक्रम विधानसभेतील बैठक व्यवस्थाही आता बदलली असेल. मंत्रीपदाची शपथ घेताना विश्वजित राणे यांना दुसर्‍या क्रमांकावर शपथ घेण्याची संधी देण्यात आली आहे.

आमदारकीची शपथ घेताना विधानसभेतील आसन व्यवस्थेत राणे यांना तिसर्‍या क्रमांकाचे आसन देण्यात आले होते तर माविन गुदिन्हो दुसर्‍या क्रमांकावर होते. आता मंत्रीपदाची शपथ घेताना गुदिन्हो तिसर्‍या क्रमांकावर होते. रवी नाईक चौथ्या क्रमांकावर कायम राहतील. आमदारकीच्या शपथेवेळी पाचव्या क्रमाकांवर असलेले सुभाष शिरोडकर सहाव्या क्रमाकांवर असतील. सहाव्या क्रमांकावर बसलेले नीलेश काब्राल पाचव्या क्रमांकावर असतील. आताच्या रचनेत रोहन खंवटे, गोविंद गावडे व बाबूश मोन्सेरात यांचे क्रमांक अनुक्रमे सात, आठ व नवव्या क्रमांकावर असतील.

गणेश गावकर हंगामी सभापती

विधानसभेच्या हंगामी सभापतिपदी सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांची राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी नियुक्ती केली. ते सभापतींची निवड होईपर्यंत विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून काम पाहतील, असे राज्यपालांनी आदेशात नमूद केले आहे.

Back to top button